
एक महिनापूर्वी पल्लवी या मुलांसह आईकडे राहायला आल्या. रविवारी रात्री राहुल हा पल्लवी यांच्या घरी गेला. त्याने पल्लवी यांच्यासोबत वाद घातला. पल्लवी यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले व पसार झाला.
नागपूर : सासरकडून पत्नीच्या नावे केलेले घर स्वतःच्या नावे करून न दिल्याने पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. ही थरारक घटना मानकापूरमधील गणपतीनगर भागात रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. मानकापूर पोलिसांनी पतीला अटक केली. राहुल संतलाल वर्मा (वय ३३, रा. सुरेंद्रगड) असे आरोपीचे तर पल्लवी राहुल वर्मा (वय ३२) असे जखमीचे नाव आहे.
राहुल हा गोधनीतील एका शाळेत लेखापाल आहे. पल्लवी या पार्लर चालवितात. त्यांना दोन अपत्ये आहेत. पल्लवी यांच्या आईने गणपतीनगर येथील घर पल्लवी यांच्या नावे केले. याबाबत राहुल याला कळले. त्याने हे घर स्वत:च्या नावे करून देण्यासाठी पल्लवी यांचा छळ सुरू केला. प्रकरण न्यायालयात गेले.
एक महिनापूर्वी पल्लवी या मुलांसह आईकडे राहायला आल्या. रविवारी रात्री राहुल हा पल्लवी यांच्या घरी गेला. त्याने पल्लवी यांच्यासोबत वाद घातला. पल्लवी यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले व पसार झाला. पोलिसांनी सोमवारी राहुल याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची तीन दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
मुलाच्या मांडीवरच आईचा मृत्यू
भरधाव ट्रकने ट्रिपलसीट दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या आईने मुलाच्या मांडीवरच जीव सोडला तर मुलगी गंभीर जखमी झाली. ही हृदयद्रावक घटना रविवारी रात्री अकरा वाजता नवीन काटोल नाका परिसरात घडली. शांताबाई बाबाराव बरडे (वय ६५, रा. दर्शन कॉलनी ) असे मृताचे तर सुधीर बाबाराव बरडे (वय ४०) व त्यांची मुलगी नंदिनी (वय ५) अशी जखमींचे नाव आहेत.