मोठी बातमी : दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाच्या मृत्यूमुळे उलटसुलट चर्चा, पुढे आली ही मागणी...

केवल जीवनतारे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

मेडिकलमध्ये तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी २०१७ पासून उपचारादरम्यान झालेल्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृत्यूचे विश्‍लेषण करणारी समिती गठित केली होती. भारतीय वैद्यक परिषदेच्या निकषाप्रमाणे शासकीय वैद्यक संस्थेत होणाऱ्या मृत्यूवर विश्‍लेषणात्मक चर्चा होणे आवश्‍यक आहे.

नागपूर : मेयो-मेडिकलमध्ये दर दिवसाला कोरोनाबाधितांचे दहापेक्षा अधिक मृत्यू होत आहेत. दोन महिन्यांपूर्वी नागपुरात कोरोनामुळे अवघे २५ जण दगावले होते. मात्र, जुलै महिन्यात कोरोनाच्या मृत्यूचा निर्दयी खेळ सुरू झाला. १७५ च्या जवळपास कोरोनाच्या मृत्यूचे आकडे पोहोचले. कदाचित मेयो-मेडिकलमधील व्हेंटिलेटरची समस्या तर नाही. व्हेंटिलेटर लावणाऱ्या बधिरीकरण विभागाची तर अडचण नाही, अशा चर्चांना मेडिकल, मेयोत ऊत आला आहे. यामुळे प्रशासनाने दोन्ही रुग्णालयांत होत असलेल्या मृत्यूचे ऑडिट करण्याची गरज निर्माण झाली आहे.

मेडिकलमध्ये तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी २०१७ पासून उपचारादरम्यान झालेल्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृत्यूचे विश्‍लेषण करणारी समिती गठित केली होती. भारतीय वैद्यक परिषदेच्या निकषाप्रमाणे शासकीय वैद्यक संस्थेत होणाऱ्या मृत्यूवर विश्‍लेषणात्मक चर्चा होणे आवश्‍यक आहे. या निकषाचे पालन करण्यासाठी डेथ ऑडिट करण्याची परंपरा तत्कालीन अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी सुरू केली.

सुपरमध्ये ८ नोव्हेंबर २०१८ रोजी एकाच रात्री तीन मृत्यू झाले होते. ही गंभीर बाब आली होती. या तिन्ही मृत्यूंवर चर्चात्मक विश्‍लेषण १९ नोव्हेंबर २०१८ रोजी झाले. मात्र फेब्रुवारी २०१९ मध्ये अधिष्ठाता डॉ. निसवाडे निवृत्त झाले. परंतु अलीकडे ही समिती थंडबस्त्यात आहे.

मात्र, आता कोरोनाची आणीबाणी आहे. या कालावधीत इतर आजारांनी मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाण अल्प आहे. परंतु, मेडिकल आणि मेयोत कोरोनाबाधितांचे मृत्यू प्रचंड वाढले आहेत. यामुळे गुंतागुंतीच्या कोरोना मृत्यूच्या कारणांचा अभ्यासच होत नसल्याचे उघडकीस आले आहे. या प्रक्रियेला नव्याने सुरुवात करून कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या कारणांचे विश्लेषण व्हावे, असा सूर पुढे आला आहे.

 

वरिष्ठ डॉक्टरांशी होते चर्चा

मेयो-मेडिकलमधील वरिष्ठ डॉक्‍टरांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या म्हणण्यानुसार मृत्यूच्या कारणांचा अभ्यास सहज करता येतो. मृत्यूच्या दाखल्यात डेथ ऑडिटची नोंद नसली, तरी केस पेपरवर ही नोंद व्यवस्थित होणे अपेक्षित आहे. रुग्णालयात कोरोनाबाधित दाखल रुग्णावरील उपचारांबाबत फाइलमध्ये उपचारांची आणि उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास त्याची सविस्तर नोंद ठेवता येते. ही माहिती भावी डॉक्टरांना मृत्यूच्या विश्‍लेषणात्मक अभ्यास करण्यासाठी आवश्‍यक असते. विशेष असे की, मृत्यूचे विश्‍लेषण योग्यरीत्या झाल्यास एकसारखी केस आल्यास काळजी घेता येते. 

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An audit the death of the corona Patient