शहर अद्याप ‘सिरो’ सर्वेक्षणापासून दूरच; ग्रामीण भागात प्रारंभ

केवल जीवनतारे
Monday, 26 October 2020

जिल्ह्यातील १३ तालुक्यात एकूण १३ क्लस्टर तयार करण्यात आले आहेत. त्यातील १२ क्लस्टरमधून तीन गावे निश्चित करण्यात आली आहेत. याशिवाय निवडक गावातून ५० व्यक्तींचे तर केवळ एका क्लस्टरमधील गावातून प्रत्येकी ५० जणांचे नमुने घेण्यात येत आहेत.

नागपूर : जुलै महिन्यात नागपूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये असलेली कोरोना विषाणूविरोधात लढण्याची प्रतिकारशक्ती (अ‍ॅन्टीबॉडीज) तपासण्यासाठी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाने पथदर्शी प्रकल्प हाती घेतला. शहर, ग्रामीण भागातील कोरोना हॉटस्पॉटसह इतर ठिकाणच्या अडीच हजार व्यक्तींची रोग प्रतिकारशक्ती तपासणीचा सिरो सर्वेक्षणाला सुरुवात केली. परंतु, तो प्रयोग फसला. यामुळे दुसऱ्यांदा चार हजार व्यक्तींच्या तपासणीचा प्रयोग सुरू केला. याला ग्रामीण भागात प्रारंभ झाला, मात्र शहरात अद्याप सर्वेक्षण सुरू झाले नसल्याची माहिती आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होऊ लागल्यानंतर सिरो सर्वेक्षणाला लवकरच सुरुवात होईल, असे सांगण्यात आले. जिल्ह्यातील तालुका स्तरावर एक हजार नमुने मेडिकलच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी आणले गेले. मात्र, शहरात अद्याप सर्वेक्षणाला प्रारंभ झालेला नाही. संबंधित व्यक्तींशी संपर्क साधला असता काही दिवसांत नमुने घेण्याच्या कार्याला प्रारंभ होईल, असे सांगण्यात आले. मात्र, अद्याप सर्वेक्षणाला प्रारंभ झालेला नाही.

क्लिक करा - ह्रदयद्रावक घटना: 15 ते 20 कुत्र्यांनी नऊ वर्षांच्या मुलाचे तोडले लचके, मूलाचा मृत्यू

जिल्ह्यातील १३ तालुक्यात एकूण १३ क्लस्टर तयार करण्यात आले आहेत. त्यातील १२ क्लस्टरमधून तीन गावे निश्चित करण्यात आली आहेत. याशिवाय निवडक गावातून ५० व्यक्तींचे तर केवळ एका क्लस्टरमधील गावातून प्रत्येकी ५० जणांचे नमुने घेण्यात येत आहेत. शहरात १० झोन आहेत. प्रत्येक झोनमध्ये प्रशासनाने ४ क्लस्टर तयार केले आहेत. प्रत्येक क्लस्टरमधून ५० व्यक्तींचे नमुने गोळा करण्यात येतील.

एका झोनमधून दोनशे असे १० झोनमधून दोन हजार नमुने गोळा करण्यात येणार आहेत. सर्व नमुने तपासणीचे काम मेडिकलमध्ये होईल. कोरोनाचे समन्वय अधिकारी म्हणून जबाबदारी असलेल्या क्रिष्णा सिरमनवार यांनी याला दुजोरा दिला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Away from the City Ciro survey