कशामुळे होणार बालोद्यान, जपानी गार्डन बंद..सविस्तर वाचा

राजेश रामपूरकर
Saturday, 25 July 2020

बालोद्यानाचा वनरक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याच्याकडेच जपानी गार्डनचा अतिरिक्त कार्यभार आहे. हे लक्षात घेऊनच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बालोद्यान व जपानी गार्डन खेळण्यासाठी आणि फिरण्यासाठी पुढील 14 दिवसासाठी बंद केले आहे.

नागपूर : सेमिनरी हिल वन परिक्षेत्रातील बालोद्यान आणि जपानी गार्डनमधील वनरक्षक कोरोनाबाधित आढळला. त्यामुळे वन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून बालोद्यान आणि जपानी गार्डन 14 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या परिसरात नागरिकांना फिरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच या कर्मचाऱ्याच्या संपर्कातील 20 कर्मचाऱ्यांना विलगीकरणात राहण्याचे आदेशही वरिष्ठांनी दिल्याची माहिती आहे. 

मागील आठवड्यात वनभवनातील लेखापालाच्या मृत्युनंतर त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर आणखी एक कर्मचारी बाधित आढळला होता. त्याच्या संपर्कातील सातही जण निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला होता. मात्र, गुरुवारी बालोद्यानाचा वनरक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याच्याकडेच जपानी गार्डनचा अतिरिक्त कार्यभार आहे. हे लक्षात घेऊनच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बालोद्यान व जपानी गार्डन खेळण्यासाठी आणि फिरण्यासाठी पुढील 14 दिवसासाठी बंद केले आहे.

जनता कर्फ्यू  :  दुकानांबाबत मनपा आयुक्त व पोलिसांत विरोधाभास, जाणून घ्या... 

वन विभागाचे विश्राम गृह, वन सभागृहही बाहेरच्या व्यक्तींसाठी बंद केले आहे. विलगीकरणातील कर्मचाऱ्यांना कोणतीही संशयास्पद लक्षणे आढळल्यास तातडीने शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करण्याच्या सुचनाही दिल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय या वनरक्षकाचा वावर असलेल्या परिसराचे तातडीने निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balodyan,Japanese Garden Closed