प्लॅस्टिक पतंग, नायलॉन मांजा वापराल तर खबरदार

राजेश प्रायकर
Tuesday, 29 December 2020

बंदी असलेला नायलॉन मांजा यंदा कमी प्रमाणात बाजारात दिसून येत आहे. याशिवाय रंगबिरंगी पतंगही ग्राहकांना आकर्षित करीत आहे. परंतु यात बंदी असलेल्या प्लॅस्टिक पतंगचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

नागपूर  ः मकरसंक्रांतीनिमित्त शहरात मोठ्या प्रमाणात पतंग व मांजाची दुकाने सजली आहे. परंतु बंदी असलेली प्लॅस्टिक पतंग व नायलॉन मांजाही विक्रीसाठी आल्याने महापालिकेने कारवाईसाठी कंबर कसली. सोमवारी पहिल्याच दिवशी पाच पतंग विक्रेत्यांवर प्लॅस्टिक पतंग ठेवल्याने कारवाई करण्यात आली.

बंदी असलेला नायलॉन मांजा यंदा कमी प्रमाणात बाजारात दिसून येत आहे. याशिवाय रंगबिरंगी पतंगही ग्राहकांना आकर्षित करीत आहे. परंतु यात बंदी असलेल्या प्लॅस्टिक पतंगचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. प्लॅस्टिकवर पालिकेने बंदी घातली आहे. त्यानंतरही पतंग विक्रेते प्लॅस्टिक पतंग विक्रीसाठी ठेवत असल्याचे आज दिसून आले. 

पालिकेच्या उपद्रव शोध पथकाने प्लॅस्टिक पतंग व नायलॉन मांजाविरोधात कारवाई सुरू केली. लक्ष्मीनगर, सतरंजीपुरा व आशीनगर या तीन झोनमध्ये कारवाई करण्यात आली. लक्ष्मीनगर झोनमध्ये एकावर तर सतरंजीपुरा व आशीनगर झोनमध्ये प्रत्येकी दोघांवर कारवाई करण्यात आली. 

या तिन्ही झोनमध्ये करण्यात आलेल्या कारवाईत २२५ प्लॅस्टिक पतंग जप्त करण्यात आल्या. उद्यापासून ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे. आज एकाही ठिकाणी नायलॉन मांजा आढळून आला नाही, विक्रेत्यांनी प्लॅस्टिक पतंग व नायलॉन मांजाला तिलांजली द्यावी, असे आवाहन उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांनी केले आहे.

पाच हजारांचा दंड वसूल

महापालिकेने आजपासून सुरू केलेल्या कारवाईत पहिल्या दिवशी पाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला होता. मागील वर्षी प्लॅस्टिक पतंग व नायलॉन माजा विक्रेत्यांवर करण्यात आलेल्या कारवाईतून एक लाखांवर दंड वसूल करण्यात आला होता. 

संपादन : अतुल मांगे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ban on plastic kites and nylon manja