Positive Story - चहा विक्रेत्याच्या मुलाने उभारली बँक; परिस्थितीवर मात करीत गाठले यशोशिखर

Bank set up by tea seller's Boy in Nagpur Gramin
Bank set up by tea seller's Boy in Nagpur Gramin

सावनेर (जि. नागपूर) : येथील चहा विक्रेत्याच्या मुलाने विपरित परिस्थितीवर मात करीत संस्था व बँक उभारून यश मिळवले आहे. देवेंद्र माणिकराव दलाल असे या तरुणाचे नाव आहे.

देवेंद्रचे आई-वडील चहा विक्रीतून कुटुंबाचा गाडा चालवित होते. यातच देवेंद्र व बहिणीचे शिक्षण सुरू होते. ते दोघे रिकाम्या वेळात फुलांचे हार विकणे, ताक विकणे, शाळेच्या सुट्ट्यांमध्ये घराशेजारी असलेल्या जिनमध्ये कामाला जाणे, अशाप्रकारे हातभार लावायचे. अशातच बारावीनंतर नागपूर येथील तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयात बीएसडब्ल्यू व त्यानंतर एम एस डब्ल्यूपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

शिक्षण घेत असताना वडिलांचे छत्र हरवले. दुःखाने खचून न जाता एम एस डब्ल्यूमध्ये टॉपर आलेला देवेंद्र सावनेरला परतला. इंग्रजी कमकुवत असल्याने उच्चपदी नोकरी मिळविण्यात तो अपयशी ठरला. देवेंद्रने मित्राच्या सांगण्यावरून सावनेर येथील लक्ष्मी महिला बहुउद्देशीय नागरी सहकारी संस्थेत डेली कलेक्शन करायला सुरुवात केली. पुढे येथील शिक्षक सहकारी बँकेत कलेक्शन करणे सुरू केले. एलआयसीमध्ये एजंटचे काम करताना कौशल्य वापरीत प्रगती साधून एलआयसीच्या कामात पहिल्याच वर्षी त्यांनी २५ लाखांचा व्यवसाय मिळविला.

बँकेत डेली कलेक्शन व्यवसायातून त्यांना भरपूर कमिशन मिळायचे. प्रगतीच्या शिखरावर असताना मित्रांच्या संगतीने देवेंद्रला व्यसनाचा नाद लागला. यामुळे तो कर्जात बुडाला. अशावेळी त्याला जगद्गुरू माउलीच्या सांप्रदायाचा मार्ग गवसला आणि तो त्यातून सावरला पण व्यसनामुळे अंगावर झालेले कर्ज फेडायचे कसे हा प्रश्न त्याला सतावत होता. देवेंद्रने आई, बहीण व जावयाला प्रामाणिकपणे ही सत्यस्थिती सांगितली. त्यामुळे शिक्षिका असलेल्या बहिणीने प्रत्येकाच्या कर्जाची फेड करून देवेंद्रला तणाव मुक्त केले.

पुढे त्याने सामाजिक भान जोपासता पैशाचे महत्त्व जाणून सावनेर येथे एका नवनिर्माण नागरी सहकारी पत संस्थेची उभारणी केली. पुढे त्यांनी सावनेरमध्ये माऊली नवनिर्माण निधी लिमिटेड नावाने बँक उभारली. बँकेतील प्रगती बघून याच बँकेची शाखा त्यांनी नागपूर येथील झिंगाबाई टाकळी परिसरात सुरू केली. दलाल यांच्या कुशल नेतृत्वाला संस्थेच्या कर्मचाऱ्यांची योग्य साथ मिळाल्याने संस्थेची प्रगती व पारदर्शक कारभारासाठी संस्थेने सहकार क्षेत्रातील बरेच पुरस्कार मिळविले.

अशाप्रकारे एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या देवेंद्रने शिक्षणाचा सदुपयोग करीत यशाचे शिखर गाठले. त्यांनी जवळपास ४० ते ५० लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. गरजूंना सहकार्य करून समाजासाठी सामाजिक व धार्मिक बांधिलकीही ते जोपासतात. त्यामुळे देवेंद्र दलाल हे शहरातील सुशिक्षित तरुणांसाठी प्रेरणादायी ठरतात यशाचे शिखर गाठण्यास ध्येय, आत्मविश्वास आणि जिद्द व प्रामाणिकपणा महत्त्वाचा असल्याचे निधी बँकेचे संस्थापक देवेंद्र दलाल यांनी सकाळला सांगितले.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com