सखींची "उमेद" तीन महिन्यात 2 कोटींच्या वर बॅंक व्यवहार!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जून 2020

बचत गटाच्या बॅंक सखींनी लॉकडाउनच्या काळातही बॅंकेतून पैसे काढणे व जमा करणे आदी ग्रामीण भागातील व्यवहार अत्यंत सुलभपणे सुरू ठेवले आहेत. मागील तीन महिन्यात 6 हजार 605 खातेदारांना तब्बल 2 कोटी 15 लक्ष 90 हजार रुपयांचा बॅंकेचा व्यवहार पॉस मशिनच्या सहाय्याने पूर्ण केला आहे.

नागपूर : यशस्वीपणे घर सांभाळत नोकरी व्यवसायही सांभाळणाऱ्या महिलांविषयी अजूनही समाजमनात शंका आहे. अनेक महिला बॅंकांच्या अधिकारीपदीही आहेत तरीही महिलांना बॅंकांचे व्यवहार कळतच नाहीत, सांभाळताही येत नाहीत, असा ठपका त्यांच्यावर ठेवला जातो. महिलांवरच्या या आरोपाला उत्तर देणारे कार्य ग्रामीण भागातील महिलांनी लॉकडाऊन काळात करून दाखविले आहे.
वडोदा कामठी येथील अल्का गंगापारी ही उच्चशिक्षित तरुणी लग्नानंतर काही काळ कॉन्व्हेट टिचर म्हणून कार्यरत होती. त्यानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्या म्हणून तिने पूर्णवेळ गृहिणी म्हणून जबाबदारी सांभाळली. काही कामानिमित्त बॅंकेत गेली असता, अल्का यांना बॅंक सखी ही संकल्पना समजली त्यांनी बॅंकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन, बॅंकसखी म्हणून काम करण्यास सुरूवात केली. आज त्या आपल्याच घरी गावातील महिलांना बॅंकेचे ऑनलाइन व्यवहार आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत आहेत.
बचत गटाच्या बॅंक सखींनी लॉकडाउनच्या काळातही बॅंकेतून पैसे काढणे व जमा करणे आदी ग्रामीण भागातील व्यवहार अत्यंत सुलभपणे सुरू ठेवले आहेत. मागील तीन महिन्यात 6 हजार 605 खातेदारांना तब्बल 2 कोटी 15 लक्ष 90 हजार रुपयांचा बॅंकेचा व्यवहार पॉस मशिनच्या सहाय्याने पूर्ण केला आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती "उमेद' अभियानांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सहाय्याने बचत गटाच्या बॅंक सखींनी बॅंकेचा व्यवहार पूर्ण करून ग्रामीण भागातील बॅंकेच्या खातेदारांना मदत केली आहे. "लॉकडाऊन' च्या काळात सामाजिक अंतर ठेवत तसेच सॅनिटायझरचा वापर करून ग्रामीण जनतेला बॅंकेच्या सेवा सहज आणि सुलभपणे उपलब्ध करून दिल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील महिलांना बॅंकेच्या व्यवहारासाठी शहरापर्यंत जाणे शक्‍य नव्हते. त्यामुळे ग्रामीण भागातच काम करणाऱ्या "उमेद' च्या बी. सी. सखींनी बॅंकेचे व्यवहार करून मागील तीन महिन्यात तब्बल 2 कोटी 15 लक्ष 90 हजार रुपयांचा बॅंकिंग व्यवहार यशस्वीपणे पूर्ण केला आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत "उमेद' अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत बचत गटाच्या सदस्यांची बी. सी. सखी म्हणून निवड केली जाते. निवड केलेल्या सख्यांना बॅंकिंग व्यवहाराबाबत प्रशिक्षण दिल्यानंतरच संबंधित बॅंकेच्या शाखेमार्फत गावातील खातेदारांना बॅंकेतून पैसे काढणे व टाकणे आदी व्यवहार करण्याची परवानगी दिली जाते.

सविस्तर वाचा - कोरोनाचा सर्वाधिक मृत्यूदर अमरावतीत

उमेदमुळे रोजगार
गोंडखैरी येथील सिंडीकेट बॅंकेमार्फत बी. सी. सखी म्हणून ग्रामीण महिलांना "लॉकडाऊन' च्या कठीण काळातही मदत करण्याचा आनंद मिळाला. "उमेद' अभियानामुळे आम्हाला रोजगार मिळाला असून, बॅंकेच्या व्यवहारासंदर्भात काम करताना नवीन तंत्रज्ञानाची ओळख झाली. या काळात तब्बल 2 हजार 120 खातेधारकांनी बॅंकेचा व्यवहार यशस्वीपणे पूर्ण करून 75 लक्ष 76 हजार रुपयांची देवाण-घेवाण पूर्ण केली आहे.
द्रौपदी टापरे, बॅंक सखी, नागपूर ग्रामीण

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bank transactions of 2 crore in three months