
नागपूर : कोरोना नाव काढताच अलीकडे मनात धडकी भरते. लॉकडाउनमुळे साऱ्यांनी स्वतःला घराच्या चार भिंतीमध्ये कैद केले आहेत. परंतु, कोरोना प्रादुर्भावाचा हॉटस्पॉट असलेल्या कोरोना वॉर्डातील कोरोनाबाधितांची सेवा करणाऱ्या परिचारिका, वॉर्ड बॉय, दवाखान्यातील मावशी यांच्यापासून तर ईसीजी तंत्रज्ञ सेवाभावी वृत्तीने कार्य करीत आहेत. आपलं घरदार, कुटुंबातील व्यक्तींनाही याचा धोका आहे, हे माहित असूनही अहोरात्र ही जोखीम स्वीकारून झटत आहेत. रुग्णालयात कोरोना रुग्णांना सेवा देणाऱ्या या सेवादूताना बळ देण्यासाठी सलाम तुमच्या सेवेला म्हणण्यासाठी आपोआपच हात वर जातो.
मानवीसमूह विचित्र अशा कोरोनाचा सामना करीत आहे. कोणीच या संकटातून वाचलेलं नाही. प्रत्येकालाच आपल्या जिवाची काळजी आहे. अनोळखीच काय पण ओळखीच्या व्यक्तीपासून चार हात अंतर ठेवून वागणारी माणसं सद्याच्या परिस्थितीत दिसत आहे. मात्र, अशाही बिकट स्थितीत रुग्णालयातील नर्स, वॉर्ड बॉय, दवाखान्यातील मावशी हे लोकं मात्र देवदूताप्रमाणे अहोरात्र रुग्णालयात दाखल कोरोनाबाधितांना औषधोपचार देत आहेत. नर्स रुग्णाच्या हातात सेवन करण्यासाठी गोळ्या देते. तर वॉर्ड बॉय चहा, जेवणापासून तर आवश्यक वस्तू रुग्णांपर्यंत पोहोचवतो. यांच्यामुळेच आपण या भयंकर संकटातही काही प्रमाणात निश्चिंतपणे दिवस काढतोय, अशा या सेवादूतांचे बळ वाढवण्याची वेळ आहे.
कोरोनामुळे सर्व क्षेत्र लॉकडाउन झाले आहेत. या लॉकडाउनचा घरी बसून बसून सारे आनंद लुटत आहेत. कोणी टिकटॉकवर आहेत. तर कोणी टीव्ही, मोबाईलवर आहेत. परंतु, कोरोना वॉर्डला ड्युटी करणाऱ्या परिचारिका, वॉर्डात काम करणारा वॉर्ड बॉय, मावशी कोरोनाच्या संकटकाळी तत्पर आहेत. मात्र, घरी हा सारा मेडिकल स्टाफ अस्पृश्यासारखा वागतो. ते स्वतः कुटुंबापासून अस्पृश्य होतात. कोरोनाच्या या संकटाने आपल्या कुटुंबावर जीवघेणा प्रसंग येऊ नये म्हणून स्वतःच्या वर्षभराच्या लेकराला मायेच्या स्पर्शापासून दूर ठेवतात.
वैद्यकीय स्टाफच्या सेवाकार्याची जाणीव ठेवा
विचार करा कोरोनाच्या भीतीने सामान्य माणसांना बाहेर पडायची देखील भीती आहे, परंतु हे परिचारिका, वॉर्ड बाय, मावशी आणि डॉक्टरही सेवादूतासारखे चोवीस तास कोरोनाबाधितांच्या सहवासात असतात. त्यांची सेवा करतात. त्यांनाही जीवाची भीती आहेच. कोरोना नावाचं संकट खूप मोठं आहे. त्याच्यासी युद्धासाठी वैद्यकीय सेवेत येणारे सर्वच डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, मावशी, तंत्रज्ञ सेवाभावी वृत्तीने काम करतात. हा धोका टाळायचा असेल तर एकच उपाय, काळजी घ्या, घरीच रहा, नियम पाळा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय स्टाफच्या सेवाकार्याची जाणीव ठेवा.
- डॉ. अविनाश गावंडे,
वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.