आयसीसीतील "मनोहर' अध्यायाला पूर्णविराम, काय आहे वाचा

ऍड. शशांक मनोहर
ऍड. शशांक मनोहर

नागपूर : काही व्यक्‍ती असे असतात, जे काम कमी परंतु, गवगवाच अधिक करतात. आणि काही व्यक्‍ती असे असतात, जे कामे करतात, पण ते कुठेही विनाकारण गवगवा करीत नाहीत. आयसीसीचे चेअरमन राहिलेले ऍड. शशांक व्यंकटेश मनोहर हे यातील दुसऱ्या कॅटेगरीत मोडतात. ऍड. मनोहर यांनी आतापर्यंत ज्या विविध क्रिकेट संघटनांवर मानाची पदे भूषविलीत, त्या सर्वच ठिकाणी त्यांनी आपला अमिट ठसा उमटविला. क्रिकेटला लोकप्रियतेच्या एका उंच शिखरावर नेवून ठेवले. 


स्वच्छ प्रतिमा, स्पष्टवक्‍तेपणा, कुशल संघटक आणि पारदर्शी कारभारासाठी क्रिकेट वर्तुळात प्रसिद्ध असलेले ऍड. मनोहर यांनी आयसीसीचे सर्वोच्च पद भूषविणे हा देशवासीयांसह वैदर्भींसाठीही फार मोठा बहुमान आहे. कारण आतापर्यंत कोणत्याच भारतीय किंवा विदर्भातील क्रिकेट प्रशासकाला हा सर्वोच्च मान मिळालेला नाही. मात्र, ऍड. मनोहर यांनी बुधवारी अचानक पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे बीसीसीआयचे आयसीसीवरील वजन तर कमी झालेच, शिवाय आयसीसीला एका कुशल लोकप्रिय संघटकाची कमरताही भविष्यात जाणवणार आहे. तशी भावना विदर्भ क्रिकेट संघटनेशी जुळलेले माजी रणजी कर्णधार प्रवीण हिंगणीकर यांनी बोलून दाखविली. तीन-तीन क्रिकेट संघटनांचे कार्य समर्थपणे सांभाळणे, हे केवळ ऍड. मनोहरांसारखीच व्यक्‍ती करू शकते. ऍड. मनोहर स्पष्टवक्‍ते असले तरी, मीडियापासून नेहमीच दूर राहिले आहेत. हीच त्यांची खासियतही होती. 



व्यवसायाने वकील असलेले 62 वर्षीय ऍड. मनोहर यांनी विदर्भ क्रिकेट संघटनेची धुरा सांभाळल्यानंतर त्यांना 2008 ते 2011 आणि नोव्हेंबर 2015 ते मे 2016 अशा दोनवेळा बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली. त्यांच्या कार्यकाळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच भारतीय क्रिकेटनेही प्रगतीचे उच्च शिखर गाठले. एकीकडे भारतीय कसोटी संघाने अव्वल स्थान पटकाविले, तर त्याचवेळी 2011 मध्ये प्रतिष्ठेचा "आयसीसी वर्ल्डकप'देखील जिंकला. "मिस्टर क्‍लीन' अशी ख्याती असलेले ऍड. मनोहर आतापर्यंतचे सर्वोत्तम बीसीसीआय अध्यक्ष असल्याचे बोलले जाते. नोव्हेंबर 2015 ते मार्च 2017 आणि मार्च 2017 ते जून 2020 या काळात ते आयसीसीवरही होते. ही सर्व पदे भूषविताना त्यांनी नेहमीच क्रिकेट आणि क्रिकेटपटूंच्या भल्यासाठी निर्णय घेतले. त्यांनी सदैव भारतीय क्रिकेटलाच आपल्या अजेंड्यावर प्रथम प्राधान्य दिले. व्हीसीएशी जुळले असतानाही त्यांनी अनेक युवा खेळाडूंच्या करिअरला उभारी दिली. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारल्या. 2010 मध्ये सुरू झालेली महत्त्वाकांक्षी निवासी क्रिकेट अकादमी व पंचांची क्रिकेट अकादमी त्यांच्याच डोक्‍यातील कल्पना आहे. शहरी व ग्रामीण भागातील असंख्य खेळाडू या अकादमीत घडले. उशिरा का होईना त्याचे फळ आता व्हीसीएला मिळू लागले आहे. 

"ऍड. शशांक मनोहर यांनी व्हीसीए, बीसीसीआय आणि आयसीसीवर पद भूषविताना नेहमीच आपला ठसा उमटविलेला आहे. त्यांच्या कारकिर्दीत क्रिकेटची नेहमीच भरभराट झाली. उल्लेखनीय म्हणजे, त्यांच्यामुळेच विदर्भाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर नावलौकिक मिळाला आहे. व्हीसीएने आज जी प्रगती साधली आहे, त्यात ऍड. मनोहर यांचे फार मोठे योगदान आहे. असा कुशल क्रिकेट संघटक दुसरा होणे शक्‍य नाही.' 
-प्रवीण हिंगणीकर, विदर्भाचे माजी रणजी कर्णधार 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com