मन सुन्न करणारी घटना! भिक्षेकऱ्याच्या अंगावर अंत्यसंस्कारानंतर फेकून दिली पीपीई किट; स्मशानभूमीतील दुर्दैवी वास्तव  

केवल जीवनतारे  
Monday, 5 October 2020

या भिक्षेकऱ्याला कोरोना म्हणजे काय हेच ठाऊक नाही..बिनधास्त रस्त्यावर फिरतो. मात्र ज्याने ही किट फेकली त्याने या भिक्षेकऱ्याचा जीव निश्चितपणे धोक्यात घातला.

नागपूर : रविवारी सकाळची घटना.... कुण्या शहाण्या माणसाने कोरोनाबाधिताचे शव जाळल्यानंतर पीपीई किट नाग नदीजवळ फेकून दिली. बाजूलाच उभ्या असलेल्या भिक्षेकऱ्याने ही किट उचलली, अंगात घालून बघितली...किटची घडी केली, टोपीत पाणी शिरले असल्याने ती झटकली. या भिक्षेकऱ्याला कोरोना म्हणजे काय हेच ठाऊक नाही..बिनधास्त रस्त्यावर फिरतो. मात्र ज्याने ही किट फेकली त्याने या भिक्षेकऱ्याचा जीव निश्चितपणे धोक्यात घातला.

कोरोनाबाधिताचे शव वा उपचारादरम्यान वापरलेली पीपीई किट, मास्क व हातमोजे या जैविक कचऱ्याची विल्हेवाट करण्याचे निकष आहेत. परंतु, या किट बेजबाबदारपणे घाटाच्या बाजूला फेकण्यात येत असल्याचे प्रकार पुढे येत आहेत. मोक्षधाममध्ये कोरोनाबाधितावर अंत्यसंस्कार केल्यानंतर कुणी तरी नागनदीच्या कोपऱ्यात पीपीई किट फेकून दिल्या.

सविस्तर वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार; जनतेची फसवणूक केल्याचा आरोप

कडेला हा भिक्षेकरी उभा होता. त्याने फेकलेली किट उचलली, अंगात घालून बघितली आणि घडी करून ठेवली. हे दृष्य अंगावर काटा आणणारे होते. पीपीई किट प्रमाणेच मास्कही मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर फेकले जात आहेत. वापरलेले मास्क सोसायटीमधील कचराकुंडीत व रस्त्यावर फेकून दिले जात आहेत. वापरलेले हातमोजेही कुठेही फेकून दिले जात आहेत.

यंत्रणा उभी करण्याची गरज

कोरोनाबाबत जनजागृती करतानाच मास्कची विल्हेवाट योग्य प्रकारे करावी, असे आवाहनही केले जाते. परंतु, मास्क नक्की कुठे टाकावा, याविषयी माहिती दिली जात नाही. वापरलेले मास्क संकलित करण्याची यंत्रणा नाही. महापालिकेने याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे, असे सामाजिक कार्यकर्ते इंटकचे नेते त्रिशरण सहारे म्हणाले.

अधिक वाचा - "आई! सांग ना माझी काय चूक? तुझा चेहरा बघण्याआधीच माझ्या नशिबी उकिरडा का"?

फेकलेले मास्क, हातमोजे व पीपीई किटवर दोन, तीन दिवस कोरोना व इतर विषाणू जिवंत राहू शकतात. रस्त्यावर फेकलेली किट भिकारी घालून बघतोय हे दृष्य भयानक आहे. रस्त्यावर पडलेले मास्क गोळा करून भिकारी घेऊन जातात. दुदैवाने भिक्षेकऱ्यांना कोरोना म्हणजे काय हेही ठाऊक नाही. त्यांच्यामुळे शहरातील नागरिकांनाही धोका आहे.
-डॉ. अविनाश गावंडे, 
वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल, नागपूर.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Begger is wearing used PPE kit at funeral