भिवापूरचे बसस्थानक होणार म्हणजे होणारच, आमदार राजू पारवे यांचा संकल्प

अमर मोकाशी
Monday, 12 October 2020

विकासाकरिता आवश्‍यक तेथे प्रशासनाला कठोर भूमिका घ्यावी लागणार असल्याचे सांगून बसस्थानकाकरीता अतिक्रमण हटविण्याची गरज पडल्यास तसा निर्णय घेण्याची तयारी त्यांनी दर्शविली. परंतू हे करताना अतिक्रमण करणाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याचीही काळजी घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्य बसस्थानकासोबतच सुसुंद्री व सिद्धार्थनगर परिसरात दोन मिनी बसस्थानकाचा सुद्धा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती यावेळी आमदार पारवे यांनी ‘सकाळ’ला दिली.
 

भिवापूर (जि.नागपूर) : भिवापूरकरांना अपेक्षित असे सुसज्ज बसस्थानकाची इमारत होणार म्हणजे होणारच, अशी स्पष्ट ग्वाही उमरेड विधानसभा क्षेत्राचे आामदार राजू पारवे यांनी आज ‘सकाळ’शी बोलताना दिली. मागील ४० वर्षांपासून भिवापूरकर बसस्थानकाच्या इमारतीची मागणी करीत आहेत. परंतू लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे ती पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यासाठी स्थानिक प्रशासनाची चालढकल वृत्तीसुद्धा बहुतांशी जबाबदार आहे. याच अनुषंगाने ‘सकाळ’ प्रतिनिधीतर्फे आज आमदार राजू पारवे यांच्याशी संपर्क साधून त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. बसस्थानकाच्या विषयाबाबत यापूर्वी जे घडले त्याबाबत मला काहीही बोलायचे नाही. हे स्पष्ट करतानाच मला मात्र भिवापूरकरांची समस्या दूर करायची असून त्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे मत यावेळी आमदार पारवे यांनी व्यक्त केले.

अधिक वाचाः सरकारी जमिनींवर अतिक्रमणाचा बोलबाला, बसस्थानकाच्या इमारतीचे काय झाले बोला !

 

प्रशासनाला कठोर भूमिका घ्यावी लागणार
गत फेब्रुवारी महिन्यात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी भेट घेऊन बसस्थानक इमारतीच्या प्रस्तावासंदर्भात चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात उद्भवलेल्या कोरोनाच्या संकटाने मतदारसंघातील अन्य विषयांसोबतच बसस्थानकाचा विषय मागे पडला. परंतू आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून बसस्थानकाच्या मागणीला मूर्त रुप देण्याच्या कार्याला निश्चितच गती देण्यात येणार असल्याचे पारवे यांनी सांगितले. बसस्थानकासाठी नागरिकांकडून सुचविण्यात आलेल्या शहरातील जमिनी अतिक्रमणाने वेढल्या गेलेल्या आहेत. याकडे पारवे यांचे लक्ष वेधले असता शहराच्या विकासाकरिता आवश्‍यक तेथे प्रशासनाला कठोर भूमिका घ्यावी लागणार असल्याचे सांगून बसस्थानकाकरीता अतिक्रमण हटविण्याची गरज पडल्यास तसा निर्णय घेण्याची तयारी त्यांनी दर्शविली. परंतू हे करताना अतिक्रमण करणाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याचीही काळजी घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्य बसस्थानकासोबतच सुसुंद्री व सिद्धार्थनगर परिसरात दोन मिनी बसस्थानकाचा सुद्धा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती यावेळी आमदार पारवे यांनी ‘सकाळ’ला दिली.

हेही वाचाः अकस्मात झालेल्या बदलीने बसला धक्का, तहसीलदारांची मॅट’कडे धाव

बसस्थानक इमारतीला कुणाचाच अडथळा नको
शहर व तालुक्याचा झालेला विस्तार बघता तालुका मुख्यालयी प्रशस्त बसस्थानकाची इमारत असणे गरजेचे आहे. यात कोणत्याही प्रकारचे राजकारण होणे अपेक्षित नाही. अतिक्रमणाचा प्रश्‍न सामोपचाराने सोडविला जाऊ शकतो.
राजेंद्र गारघाटे
माजी पं. स. उपसभापती

इमारत होणे नितांत आवश्‍यक
महामार्गावरुन धावणारी वाहने व प्रवाशांची संख्या बघता बसस्थानक इमारतीची समस्या प्राधाण्याने सोडविणे गरजेचे झाले आहे. यात  काही अडचणी आल्यास नागरिक व सर्वच राजकिय पक्षाच्या मंडळींनी एकत्र येवून त्या दूर केल्या जाऊ शकतात.
शंकर डडमल
जिल्हा परिषद सदस्य

संपादनःविजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhivapur bus stand will happen, MLA Raju Parve's decision