महिलांना रोजगारासाठी दिशा देण्याचे कार्य : नितीन गडकरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

आज महिला अनेक क्षेत्रात पुढे आहेत. विविध प्रकारची कामे त्या करू शकतात. विविध कलागुण महिलांमध्ये आहेत. ती कला विकसित करून त्याचा उपयोग रोजगार आणि स्वावलंबी होण्यासाठी कसा होईल, हे काम महिला आघाडीला करायचे आहे. हे मोठे काम आहेत, असे नितीन गडकरी म्हणाले. 

 नागपूर : कौशल्य असलेल्या महिलांनी इतरांना रोजगार मिळेल, यासाठी प्रयत्न करावेत. निराधार महिला स्वत:च्या पायावर कशा उभ्या राहतील, यासाठी त्यांना दिशा देण्याचे कार्य भाजपा महिला मोर्चाने करावे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या सदस्यांशी गडकरींनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. कोरोनाचे संकट जागतिक संकट आहे. जोपर्यंत त्यीा प्रतिबंधक लस मिळत नाही, तोपर्यंत योग्य नियम पाळून कोरोनासोबत जगणे प्रत्येकाला शिकावे लागेल. आत्मनिर्भर भारत या योजनेतून स्वत:च्या पायावर उभे राहून स्वावलंबी होण्याची ही संकल्पना आहे. आज महिला अनेक क्षेत्रात पुढे आहेत. विविध प्रकारची कामे त्या करू शकतात. विविध कलागुण महिलांमध्ये आहेत. ती कला विकसित करून त्याचा उपयोग रोजगार आणि स्वावलंबी होण्यासाठी कसा होईल, हे काम महिला आघाडीला करायचे आहे. हे मोठे काम आहेत, असेही ते म्हणाले. 

 वाचा : लॉकडाऊनमुळे लोककलावंतांचा रोजगार "लॉक 

महिलांनी कोणता उद्योग करावा, त्यांच्यात कोणते कलागुण आहेत, त्याप्रमाणे कोणता उद्योग त्यांनी करावा, याची माहिती करून घ्यावी. एमएसएमईतर्फे मी या कामात मदत करायला तयार आहे. विविध योजनांची माहिती महिला आघाडीने घ्यावी व त्याप्रमाणे इच्छुक महिलांना त्यांनी मार्गदर्शन करून दिशा द्यावी. विविध वस्तू बनविण्याचा उद्योगही महिला करतात. त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचा दर्जा उत्तम असावा. दर्जामध्ये कोणताही समझोता केला जाऊ नये. तरच या वस्तू बाजारात टिकाव धरतील व आपल्याला बाजाराचा फायदा होईल. हा आत्मनिर्भरतेचा मार्ग आहे. आर्थिकदृष्टीने सक्षम होण्याचा मार्ग असल्याचेही गडकरी यावेळी म्हणाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Mahila Morcha should try to provide employment to women