अपमान जिव्हारी लागल्याने भाजप कार्यकर्त्याने केले असे...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

बंडू हे भाजपचे कार्यकर्ते असल्याने त्यांचे गावातील अन्य राजकीय पक्षाच्या मंडळींसोबत फारसे पटत नव्हते. यातूनच निवडणूक निकालाच्या दिवशी त्यांचे विरोधी गटातील काहींशी भांडण झाले होते. त्यानंतर झालेली मारहाण सहन न झाल्यानेच बंडूने आत्महत्येचा मार्ग निवडल्याची चर्चा नक्षीत रंगल्या आहेत. 

भिवापूर (जि. नागपूर) : तालुक्‍यातील नक्षी ग्रामपंचायत सदस्य यांचे पती व भाजपचे कार्यकर्ते बंडू भोयर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता. 11) उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी जिल्हा परिषदेच्या निकालानंतर राजकीय वादातून दोन व्यक्तींनी बंडू यांना मारहाण केली होती, असे समजते. भिवापूर पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बंडू यांच्या पत्नी वंदना भोयर या नक्षी ग्रामपंचायतीमध्ये सदस्य आहे. त्या भिवापूरच्या आठवडी बाजारात पत्नीसह गेल्या होत्या. बंडू यांनी पत्नीला बाजार करायला सांगून घरी परत गेले व गळफास लावला. पत्नी वंदना भिवापूरवरून परत आल्यावर ही घटना उघडकीस आली. त्यांना आठ व दहा वर्ष वयाची दोन मुले असून, घटनेच्या वेळेस दोन्ही मुले शाळेत गेली होती.

हेही वाचा - कारमध्येच रंगली वाढदिवसाची पार्टी; पोलिसांनी उतरविली 'झिंग'

सूचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शनिवार नक्षी येथे बंडू यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास ठाणेदार महेश भोरटेकर करीत आहेत. 

निवडणूक निकालानंतर वाद

बुधवारी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा निकाल घोषित झाला. निकालानंतर गावातील काही लोकांसोबत बंडूचा वाद झाला होता. या वादातून दोघांनी मिळून बंडू यांना जबर मारहाण केली होती. हाच वाद उकरून काढत गुरुवारी सकाळी वरील दोघांपैकी एकाने पुन्हा बंडू यांना मारहाण केली. हा अपमान जिव्हारी लागल्यानेच त्याने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची चर्चा गावात सुरू आहे.

अधिक वाचा - 'ते' शेतात चारा कापत होते अन्‌ अचानक घडले असे... 

राजकीय वाद जिवावर बेतला

मृत बंडू हे भाजपचे कार्यकर्ते असल्याने त्यांचे गावातील अन्य राजकीय पक्षाच्या मंडळींसोबत फारसे पटत नव्हते. यातूनच निवडणूक निकालाच्या दिवशी त्यांचे विरोधी गटातील काहींशी भांडण झाले होते. त्यानंतर झालेली मारहाण सहन न झाल्यानेच बंडूने आत्महत्येचा मार्ग निवडल्याची चर्चा नक्षीत रंगल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP worker suicide in Nagpur district