खबरदार ! येथे मृतदेह जाळता येणार नाही, कारण सांगितले असे...

रूपेश खंडारे
Wednesday, 16 September 2020

ग्रामीण भागात आता मृत्यूची मालिका सुरू झाली आहे. शिवाय पावसाळ्याचे दिवसही आहेत. कोरोनाकाळात शहरात एका गृहस्थाचा मृत्यू झाला. त्याची अंत्ययात्रा नव्यानेच निर्मित  मोक्षधामावर नेण्यात आली. परंतू पुढे मात्र विचित्रच घडले. जीवंतपणी यातना भोगत असताना जो येतो, त्यापेक्षा भयंकर प्रत्यय मृताच्या नातेवाइकांना आला, काय घडले ते वाचाच...

 पारशिवनी (जि.नागपूर) :  शहरात मोक्षधाम तयार असून येथे मात्र शवदाह करण्यात येत नाही, ही आश्‍चर्याची गोष्ट नाही का? त्यापेक्षा संताप आणणारी गोष्ट अशी की मोक्षधामच्या उद्धाटनाची वाट असल्याने पारशिवनीच्या नागरिकांना धोगरा येथे ४किलोमीटर अंतरावर जावे लागते.

येथे दहनक्रिया करता येणार नाही !
पारशिवनी शहरात आजपर्यंत मोक्षधाम नव्हते. पूर्वी काशी क्षेत्रात एका लहानशा टिनाच्या छताखाली शवदहन केले जात होते. पण आता मोक्षधाम तयार असून मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी खाचखडग्यांची वाट तुडवित जावे लागते. बऱ्याच कालातंराने या ठिकाणी  देखणे आणि सर्वसोयींनी युक्त असे मोक्षधाम तयार करण्यात आले. त्यासाठी एक कोटींचा खर्च करण्यात आला. परंतू आजही पारशिवनीतील नागरिकांना येथे  शवदाहक्रिया करण्यास मनाही करण्यात येते. या मोक्षधामाचे विधिवत उद्धाटन झाल्यावरच येथे शवदहन करण्यात येईल, अशी तंबी नागरिकांना एका माजी लोकप्रतिनिधीने दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पारशिवनी शहरापासून चार किलोमीटर अंतरावरील पेंच नदी पात्र धोगरा येथे नागरिकांना मृतदेहावर अंतिम संस्कार करावे लागत आहे.

अधिक वाचाः जरा जपून रे राजा, राजमार्ग झालाय खाचखड्डयांचा ! अनेक ठिकाणी हे मार्ग आहेत धोकादायक...
 

मृतदेहाची राखही हाती आली नाही !
मागील महिन्यात एका गृहस्थाचा मृत्यू झाल्याने त्याच्या पार्थिवावर अंतिम विधी काशी क्षेत्र नवीन मोक्षधाम येथे करण्यात येणार होता. त्या काळात धोगरा-पेंच नदीला पूर आला असल्याने धोगरा नदी या ठिकाणी शवदहन करणे शक्य नसल्याने काशी मोक्षधाम येथे अंत्यविधी करण्यास मृतदेह नेण्यात आला. येथे मृतदेह जाळता येणार नाही, असे फर्मान कुणीतरी सोडले. कारण विचारले तर काय, उद्धाटन व्हायचे आहे, असे एका माजी लोकप्रतिनिधीचा आदेश असल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी पूर्ण काम व्हायचे बाकी आहे. त्यामुळे येथे मृतदेह जाळता येणार नाही. पण मृतदेहावर अंत्यसंस्कार करायचा कुठे हा प्रश्‍न आहे. नदीतिरावर पूर असल्याने तिथे मृतदेह जाळता येणार नाही. जुने शेड होते, तेथेही पुराचे पाणी असतेच. पेंच नदीला महापूर आल्याने संपूर्ण काशी मोक्षधाम पुराच्या पाण्यात डुबले. कुटुंबातील नातेवाइकांच्या हातात मृतदेहाची राखसुद्ध आली नाही, ही शोकांतिका आहे.

हेही वाचाः कोण ‘तो’? आसवांच्या ओंजळीत सोडून गेला आठवणींचे पक्षी!
 

मग बांधलेच कशाला मोक्षधाम?
जर एक कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेले मोक्षधाम उद्धाटनाची वाट पाहत असेल तर शव पेटवायचे कुठे?   कुणाच्या मरणाची वाट पाहत आहे येथील मोक्षधाम? काम अपुरे असेल तर ते लवकरात लवकर कंत्राटदाराने पूर्ण करावे, असा आदेश संबंधित विभागाने दयावा व   अपुऱ्या असलेल्या सोई, सुविधा पूर्ण करुन या ठिकाणी नागरिकांना मृतदेहावर संस्कार करण्याची परवानगी देण्याची मागणी नागरिकांतून हेत आहे.

संपादनः विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bodies cannot be cremated here