माजी उपसंचालक व क्रीडा अधिकाऱ्याने बनवले नातेवाइकांचे बोगस प्रमाणपत्र !

नरेंद्र चोरे
Thursday, 22 October 2020

या घोटाळ्यासंदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर मानकापूर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. सुरुवातीला सांगलीच्या रवींद्र व संजय यांना अटक केल्यानंतर रेवतकर व पडोळे या क्रीडा अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेऊन या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. पोलिसांनी रेवतकर यांची कार व संशयास्पद कागदपत्रे जप्त केली असून, पडोळे यांचीही कार ताब्यात घेण्यात आली आहे.

नागपूर : बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी सध्या पोलीस कोठडीत असलेले सेवानिवृत्त क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर व क्रीडा अधिकारी महेश पडोळे यांनी आपल्या नातेवाइकांच्या नावाने बोगस प्रमाणपत्र काढल्याचे तपासात पुढे आले आहे. या गंभीर प्रकारामुळे अधिकाऱ्यांवरील संकट आणखी गडद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

बनावट क्रीडा प्रमाणपत्राचा तपास करीत असलेले मानकापूर ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंतच्या तपासात आरोपींकडून बरीच महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. उल्लेखनीय म्हणजे या अधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करत कुटुंबीय व नातेवाइकांना फायदा पोहोचविण्यासाठी त्यांच्याच नावाने बोगस प्रमाणपत्र बनवून शासनाची फसवणूक केली. या अधिकाऱ्यांनी संगनमत करून नेमकी किती बोगस प्रमाणपत्र बनविली, प्रमाणपत्र कुणाकुणाला दिले आणि यात कोण सहभागी आहेत, याचाही शोध घेतला जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महत्त्वपूर्ण धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. 

 

हेही वाचा : *आईने टाकलेल्या बाळासाठी मंगेशी झाली माई; उमेद संकल्प संस्थेने घेतले दत्तक*

 

या घोटाळ्यासंदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर मानकापूर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. सुरुवातीला सांगलीच्या रवींद्र व संजय यांना अटक केल्यानंतर रेवतकर व पडोळे या क्रीडा अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेऊन या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. पोलिसांनी रेवतकर यांची कार व संशयास्पद कागदपत्रे जप्त केली असून, पडोळे यांचीही कार ताब्यात घेण्यात आली आहे. दोघेही येत्या २६ पर्यंत पोलीस कोठडीत आहेत. तर न्यायालयीन कोठडीत असलेले सावंत बंधू सध्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहेत. दैनिक 'सकाळ'ने राज्यातील बोगस खेळाडू व बनावट प्रमाणपत्रांचे हे गंभीर प्रकरण उचलून धरले आहे. 

पोलिसांचे पथक औरंगाबादमध्ये 

या घोटाळ्याचे मुख्य केंद्र औरंगाबाद असून, तिथे मुख्य सूत्रधार व लाभार्थी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनात मानकापूर पोलिसांचे एक पथक औरंगाबादमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे सध्या फरार असलेला मुख्य सूत्रधार व त्याच्या टोळीस कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. 
 

संपादन  :  किशोर जामकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bogus Certificates of Relatives made by Former Deputy Director and Sports Officer!