ब्रेकअप झालं म्हणून भर रस्त्यात प्रेयसीवर केला चाकूहल्ला; नागरिकांनी केली प्रियकराची बेदम धुलाई

अनिल कांबळे 
Wednesday, 9 December 2020

दिवसाढवळ्या  ही थरारक घटना घडली. या घटनेने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. मनिषा (वय २५,रा.नंदनवन) असे जखमी तरुणीचे नाव आहे. तिच्यावर मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी हल्लेखोर प्रियकर प्रशांत देवेंद्र भारसागडे (वय २४ रा. देवरी,जि.गोंदिया) याला अटक केली आहे.

नागपूर ः ब्रेकअप झाल्यानंतर प्रेमसंबंंध कायम ठेवण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या प्रियकराने २५ वर्षीय प्रेयसीच्या पोटात चाकू भोसकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना मंगळवारी सकाळी नंदनवनमधील राजेंद्रनगर परिसरात घडली. 

दिवसाढवळ्या  ही थरारक घटना घडली. या घटनेने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. मनिषा (वय २५,रा.नंदनवन) असे जखमी तरुणीचे नाव आहे. तिच्यावर मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी हल्लेखोर प्रियकर प्रशांत देवेंद्र भारसागडे (वय २४ रा. देवरी,जि.गोंदिया) याला अटक केली आहे.

हेही वाचा - धक्कादायक! चक्क अधिकारीच घेतात भूखंड रिकामे करून देण्याची सुपारी; नागपूरच्या धंतोली...

नंदनवन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषा ही एका नामांकित हॉस्पिटलमध्ये परिचारिका (नर्स) आहे. प्रशांत हा गोंदियात खासगी काम करतो. दीडवर्षापूर्वी मनिषाने मोबाइलवरील मिसकॉलमुळे प्रशांतसोबत ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रशांत हा मनिषावर जिवापाड प्रेम करायला लागला. तर मनिषाचेही प्रेम होते. 

गेल्या काही दिवसांपूर्वी मनिषा प्रशांत याला टाळायला लागली. प्रशांत हा तिच्या मोबाइलवर संपर्क साधायचा. मात्र मनिषा प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे प्रशांत खूप चिडला होता. आज मंगळवारी मनिषा सकाळी ११ वाजता हॉस्पिटलमधून घरी जात होती. राजेंद्रनगर भागात प्रशांत याने तिला अडविले. तिला फोन न उचलण्याबाबत जाब विचारला. त्यावर तिने उत्तर देण्यास नकार दिला. प्रशांतने पाठीमागे लपविलेला चाकू काढला आणि सपासप मनिषाच्या शरीरावर वार करायला लागला. मनिषाने आरडाओरड केली. ती काही वेळातच रक्ताच्या थारोळ्यात पडली. नागरिकांनी लगेच आटो करीत मनिषाला मेडिकलमध्ये दाखल केले. मनिषाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

नागरिकांनी केली धुलाई

प्रशांतच्या हातात रक्ताने माखलेला चाकू होता तर बाजूलाच मनिषा रक्ताच्या थारोळ्या विव्हळत होती. अशा स्थितीत एका युवकाने जीवाची पर्वा न करता प्रशांतच्या अंगावर झाप घालत त्याच्या हातचा चाकू हिसकला. त्यानंतर नागरिकांनी प्रशांत याला पकडले. त्याला चांगलाच चोप दिला. गस्तीवर असलेले पोलिस तेथे पोहोचले. नागरिकांच्या तावडीतून प्रशांत याची सुटका केली. त्याला पोलिस स्टेशनमध्ये आणले. पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून प्रशांत याला अटक केली.

नंदनवनमधील केडीके कॉलेज रोडवर मार्च २०११ ला मोनिका किरणापुरे हत्याकांड घडले होते. आज त्याच ठिकाणी एका तरूणीवर चाकूहल्ला झाल्यामुले मोनिका हत्याकांडाच्या आठवणी ताज्या झाल्या. दोन्ही हल्ल्याचे घटनास्थळ एकच असल्यामुळे अनेकांना मोनिका किरणापुरे हत्याकांड आठवले. त्या हत्याकांडाची नागरिकांमध्ये चर्चाही सुरू होती.

हेही वाचा - 'पेढा-बर्फी नको, हिरवी नोट द्या', रुग्णालयात चिरीमिरी घेत बाळाला सोपविले जाते...

असहनीय ‘ब्रेकअप’

ब्रेकअपचे दुःख सहन न झाल्यामुळे प्रेयसीवर हल्ला केल्याच्या बऱ्याच घटना शहरात उघडकीस आल्या आहेत. एका प्रियकराने थेट चेहऱ्यावर ॲसीड फेकण्याची धमकी दिली होती तर तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत ब्रेकअप केल्यामुळे प्रेयसीने प्रियकराचे मित्रांच्या मदतीने अपहरण करून टक्कल केले होते. एका प्रियकराने तर प्रेयसीचे अश्‍लील फोटो सोशल मिडियावर व्हायरल केल्याची घटना समोर आली आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boy attacked on girl In Nagpur as they brokeup