
नागपूर : रामेश्वरी चौकातील गुप्ता कॉम्पलेक्सचे मालक बिल्डर रविशंकर गुप्तासह भागीदाराला अजनी पोलिसांनी सुरेश कनोजीया जळीतकांडप्रकरणी अटक केली आहे. बुधवारी दोघांनाही न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. रविशंकर चंद्रभान गुप्ता (45, रा. प्लॉट नं. 37, 38, पार्वतीनगर) व भागीदार संदीप त्रिभुवन पांडे (32, रा. काशीनग) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजनी हद्दीतील शताब्दी चौक, काशीनगर परिसरात खांडेकर ले-आउटची जागा आहे. हे ले-आउट अनधिकृत असल्याचे माहित असूनही गुप्ता व पांडे यांनी विठाबाईकडून जागा विकत घेतली. त्यावर नासुप्रकडून बांधकाम नकाशा मंजूर न करता नियमाला धाब्यावर बसून दोन माळ्यांची इमारत बांधली. तसेच यात आठ दुकानाचे गाळे काढले.
याच इमारतीतील एक गाळा विकत घेण्यासाठी रेल्वेमधून लोकापायलट पदावरून सेवानिवृत्त झालेले सुरेश फूलचंद कनोजिया (65, रा. बेलतरोडी) यांनी 15 लाखांत सौदा केला. अग्रीम म्हणून त्यांनी काही रक्कम दिली. मात्र, नंतर विक्रीपत्र करून न देता हा गाळा त्याने द्वारकापुरी येथे राहणारे विनायक बोरकर यांना 20 लाख रुपये (धनादेश) अधिकचे घेऊन विक्रीपत्र करून विकला. यादरम्यान इमारत अनधिकृत असल्याने नासुप्रने त्यावर बुलडोजर चालविला.
ही बाब कनोजीया यांना कळताच त्यांनी गुप्ताच्या मागे पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. मात्र, गुप्ताने त्यांचा मानसिक छळ केला. शेवटी त्याने केवळ दोन लाख रुपये परत केले. उर्वरित रकम परत करण्यास पुन्हा गुप्ता टाळाटाळ करू लागला. फसवणूक करीत पैसे न देता छळ केल्याने कनोजिया यांनी अंगावर पेटोल ओतून आत्महत्या केली. याप्रकरणी अजनी पोलिसांनी प्राथमिकदृष्ट्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून आरोपी गुप्ता व पांडेला अटक केली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष खांडेकर करीत आहे.
बिल्डर रविशंकर गुप्ता व संदीप पांडे यांनी अनेकांची फसवणूक केली आहे. प्लॉट मालकाला त्याने अद्याप पूर्ण पैसे दिले नाही. दुकानाचा गाळा विक्रीच्या नावाखाली राजेश शुक्ला यांची 35 लाखाने तर द्वारकापुरी येथील विनायक बोरकर यांची 25 लाखाने, हरीश माकिजा यांची सहा लाखाने, मदन कावरे यांची तीन लाखाने, शेख अन्वर यांची तीन लाखाने, संजय बंड यांचे 18 लाख रुपये, चिंटू कनोजीया यांची दोन लाख, चित्रा टॉकीज गवळी पुरा येथील रवी दांदळे (यादव) यांची 20 लाखाने फसवणूक केली. 8 मे 2019 रोजी नासुप्रने ही इमारत पाडताच दांदळे यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना बायपास शस्त्रक्रिया करावी लागली.
दांदळे यांच्यासह काही पीडितांनी 13 मे 2019 रोजी अजनी पोलिस ठाण्याचे तत्कालीन वादग्रस्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक हनुमंत उरलागोंडावार यांच्याकडे फसवणुकीची तक्रार केली. हा तपास पीएसआय चप्पे यांच्याकडे देण्यात आला. मात्र, वेळीच कारवाई न करता तपास थंडबस्त्यात ठेवला होता. शेवटी पोलिसांच्या दुर्लक्षामुळे सुरेश कनोजीया या पीडिताला जीव गमवावा लागला. त्यामुळे याप्रकरणाच्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.