संत्रानगरीतून दुचाकीचोर "बंटी-बबली'ला अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जून 2020

गुन्हेगार कितीही चालाक आणि हुशार असले तरी ते पाेलिसांच्या तावडीतून सुटू शकणार नाहीत. दुचाकी चाेरी करणे ही आता फार साेपी गाेष्ट झाली आहे. कमी वेळात पैसे कमावणे आणि माैजमजा करण्यासाठी चाेरी करण्याच्या घटना वाढल्या आहेत. नागपूर पाेलिसांनी अशाच एका जाेडप्याला हातकडय़ा ठाेकल्या आहेत.

नागपूर :  पोलिसांनी वाहनचोरीचा पर्दाफाश करीत गुन्हेगाराची पत्नी व तिच्या साथीदाराला अटक केली आहे. वृषभ ऊर्फ लालू श्‍यामसुंदर अशोपा (वय 25,रा. जलारामनगर) व सुखमनी ऊर्फ टिना परसजित सौंद ऊर्फ सौन, अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत.

रामदासपेठेतून सिद्धांत प्रकाश चांडक (वय 27 ) याची दुचाकी चोरी गेली. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. सीताबर्डीचे हवालदार जयपाल राठोड, चंद्रशेखर भोयर, अरुण लक्षणे, चंद्रशेखर गौतम, बुलवंत व कल्याणी यांनी चोरट्याचा शोध सुरू केला.

वाचा- नागपूर ब्रेकिंग : उपराजधानीत कोरोनास्फोट, एकाच दिवशी आढळले 85 बाधित
एवढया मोठया शहरात गुन्हेगारांचा छडा लावणे म्हणजे अत्यंत जिकरीचे काम होते. परंतु, पोलिसांनी प्रयत्न सोडले नाहीत. तंत्रज्ञान मदतीला आले. ज्या भागातून दुचाकी चोरीला गेली तेथील सीटीव्ही फुटेजची पाहणी केली.

 तरुण व तरुणी मोटारसायकल चोरी करीत असल्याचे पोलिसांना दिसले. याआधारे शोध घेऊन पोलिसांनी टीना आणि वृषभ याला अटक केली. वृषभ हा स्पेअरपार्टचे काम करतो, तर टीना ही गिट्टीखदानमधील एका हत्याकांडात शिक्षा झालेल्या आरोपीची पत्नी आहे, अशी माहिती सीताबर्डी पोलिसांनी दिली. दोघांची एक दिवस पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bunty-Babli arrested under the charge of two-wheeler theft