डिझेलचा ठणठण गोपाळ, प्रवासी रामभरोसे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

शुक्रवारी दिवसभरात 15 हजार किलोमीटर लांबीच्या शंभर फेऱ्या रद्द करण्यात आल्या. दिवसभरात एसटीचे 3 लाखांचे नुकसान झाले. बसफेऱ्या रद्द झाल्याने चांगलीच ओरड सुरू झाली. वाढता दबाव लक्षात घेता अखेर टॅंकर मागवून घेण्यात आले.

नागपूर : गणेशपेठ आगारातील डिझेल संपण्याची मालिका कायम आहे. पुरेसे डिझेल नसल्याने शुक्रवारीसुद्धा अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या. आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या एसटी प्रशासनाला डिझेल आणण्यासाठी पैशांची जुळवाजुळवसुद्धा करता आली नाही. यामुळे अनेक बसेस आगारातच उभ्या असल्याचे दिसून आले. फेऱ्या रद्द झाल्याने सुमारे 3 लाखांचे नुकसान झाल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे.

सविस्तर वाचा - सोने लपविण्याची अशीही शक्‍कल, नया जमाना नयी सोच

डिझेलचा ठणठणाट ही केवळ गणेशपेठ आगाराची समस्या नाही, तर अनेक ठिकाणी डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी अनेक बसफेऱ्या रद्द कराव्या लागत असून त्यामुळे एसटीचे उत्पन्नही बुडत आहे. प्राप्त माहितीनुसार गुरुवारी दुपारपासून गणेशपेठ आगारात डिझेलचा तुटवडा निर्माण झाला होता. ही स्थिती लक्षात घेता टॅंकरची मागणी नोंदविणे आवश्‍यक होते. पण, पैशांची तरतूद होत नसल्याने टॅंकर मागविता आले नाही. परिणामी बऱ्याच फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. तर आगारात उभ्या बसेसमधून डिझेल काढून काही बसेस चालविण्यात आल्या. लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस थांबवून कमी अंतरावरील बसेच चालविण्याचे नियोजन करण्यात आले. सूत्रांच्या दाव्यानुसार शुक्रवारी दिवसभरात 15 हजार किलोमीटर लांबीच्या शंभर फेऱ्या रद्द करण्यात आल्या. दिवसभरात एसटीचे 3 लाखांचे नुकसान झाले. बसफेऱ्या रद्द झाल्याने चांगलीच ओरड सुरू झाली. वाढता दबाव लक्षात घेता अखेर टॅंकर मागवून घेण्यात आले. पण, टॅंकर पोहोचण्यासाठी दुपारचे 2 वाजले होते. डिझेल आल्यानंतर बसेसमध्ये भरून फेऱ्या सोडण्यात आल्या. आतापर्यंत वाहक-चालक नसल्याने बसफेरीला उशीर होत असल्याचे प्रवाशांच्या ऐकीवात होते. पण, डिझेल नसल्याने बसफेऱ्या रद्द करण्यात येत असल्याचे प्रवाशांना सांगितले जात आहे. हा प्रकार प्रवाशांना आश्‍चर्याचा धक्का देण्यासह संताप आणणारासुद्धा ठरला आहे. खासगी शिवशाही आणि ट्रॅव्हल्सना लाभ पोहोचविण्यासाठी जाणीवपूर्वक हा प्रकार सुरू असल्याचा आरोप खुद्द कर्मचाऱ्यांनीच नाव न छापण्याच्या अटीवर केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Buses can't run due to scarity of fuel