हिंगणा एमआयडीसीत डंम्पिंग यार्डसाठी कुणी जागा देता का जागा !

सोपान बेताल
Tuesday, 6 October 2020

एक लाख लोकसंख्या असलेल्या निलडोह; डिगडोह व वानाडोंगरी ग्रामपंचायचे  डंम्पिंग यार्ड नाही. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा नाही. कामगारांचे प्राबल्य असलेल्या या भागात प्रदुषण व कामगारांच्या आरोग्याचा प्रश्‍न बिकट झाला असल्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावणे अगत्याचे झाले आहे. एमआयडीसीने जागा उपलब्ध करून दिल्यास हा प्रश्‍न सुटू शकतो. स्थानिक लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांचे यावर ‘सकाळ’ ने विचारमंथन घडवून आणले. त्यात व्यक्त झालेली मते- 

हिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर) : निलडोह, डिगडोह या मोठ्या लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती आहेत. लोकसंख्या लाखाच्या घरात आहे. त्यानुसार कचराही जास्त निघतो, पण एमआयडीसी डंम्पिग यार्डसाठी जागा देत नसल्याने जिथे जागा दिसेल तिथे नाइलाजास्तव कचरा  टाकला जातो. त्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा आणि डम्पिंग यार्डसाठी जागा देण्याची मागणी दोन्ही ग्रा.पं.मधील लोकप्रतिनिधी व जाणकार नागरिक करीत आहेत. परिसरातील कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायत निलडोह येथे दोन घंटागाडी, तर तीन रिक्षे तैनात आहेत. डिगडोह ग्रामपंचायत येथे पाच घंटागाडीने कचऱ्याची उचल केली जाते. निलडोह ग्रामपंचायतचा कचरा पॉलीमार कंपनी समोरील नाल्याच्या बाजूला खाली असलेल्या एमआयडीसीच्या जागेवर फेकला जातो, तर डिगडोह ग्रामपंचायत परिसरातील कचरा डिफेन्स रेल्वे लाईनवरील खाली असलेल्या जागेवर टाकला जात असल्यामुळे  हिंगणा एमआयडीसीत डंम्पिंग यार्डसाठी जागा मिळावी, अशी अपेक्षा येथील नेते, सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

अधिक वाचाः नरखेड, काटोलच्या  संत्र्यांचा गोडवा अधिक वाढणार, विक्रीसाठी जाणार देश-विदेशात
 

डिगडोह येथे डंम्पिंग यार्ड पाहिजेच
मी जिल्हा परिषद सदस्य असताना एमआयडीसीत जागेची मागणी केली. पण एमआयडीसीने जागा दिली नाही. जर जागा मिळाली असती तर आतापर्यंत डंम्पिंग यार्ड तयार झाले असते आणि लोकांना त्रास झाला असता. परिसराचे सौंदर्य खराब झाले नसते. तरी आमदार मेघे यांच्याकडे पाठपुरावा सुरु असल्याचे माजी जि.प.सदस्य अंबादास ऊके यांनी सांगितले. तर जिल्हा परिषद सभेत डिगडोह  ग्रामपंचायत परिसरात डम्पिंग यार्डसाठी रेल्वची खाली पडून असलेली जागा मिळावी, यासाठी आवाज उचलला. गावातील कचऱ्याची योग्य जागेवर विल्लेवाट लागावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे. वेळ आल्यास रस्त्यावर उतरणार आहे. कारण पिण्याचे पाणी आणि घरातील कचऱ्याची विल्लेवाट लावणे हा विषय महिलाकरीता करीता महत्वाचा आहे. लवकरच पालकमंत्र्याची भेट घेणार असल्याचे जि.प.सदस्य सुचीता विनोद ठाकरे म्हणाल्या.

अधिक वाचाः शेतकरी म्हणतात, अरे कुठे नेऊन ठेवले भाऊ पांदण रस्ते?
 

कचरा देतोय धोक्याची घंटी
ग्रामपंचायत डिगडोहने मासिक सभेत ठराव पास केला. डम्पिंग यार्डसाठी एमआयडीसीला जागेची मागणी केली. जागा अजूनही मिळाली नाही. परिसरात हा प्रश्न धोक्याची घंटी आहे. मोठ मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये डम्पिंग यार्ड बनने शासनाने अनिवार्य करावेत. याकडे जर शासनाने डोळे बंद केले तर ही समस्या भविष्यात मोठे विक्राळ रूप धारण करणार आहे.
सुरेश काळबांडे
पंचायत समिती सदस्य

डंम्पिग यार्ड रोजगार देईल
घंटागाडी जमा करत असलेला ओला कचरा, सुखा कचरा वेगळा केला जाईल. त्यासाठी काम करणाऱ्या कामगारांना रोजगार मिळेल. त्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाईल. त्यापासून खत तयार होईल. या खताची विक्री करुन पैसाही उभा केला जाईल. यासाठी जिल्हा परिषदेत आवाज उचलणार.
निलडोह परिसरात कचऱ्याचे ढिगारे लागले आहे . जनतेला त्रास होत आहे.प्रसंगी आंदोलन केले जाईल.
राजू हरडे
जि.प.सदस्य निलडोह-वडधामना

निलडोह, डिगडोह संयुक्त डंम्पिग यार्ड करा
निलडोह परिसरात अनेक ठिकाणी एमआयडीसीची जागा पडून आहे. अजूनही एमआयडीसीने तिथे काहीच केले नाही. गावाचा कचरा जसा  
निघतो तसाच एमआयडीसीतील कंपन्याचाही कचरा रस्त्यावर फेकला जातो. जशी  ग्रामपंचायतची आहे, तशीच एमआयडीसीलाही गरज आहे. आता एमआयडीसीने पुढाकार घ्यावा आणि डंम्पिंग यार्ड निर्माण करावे.
अशोक वैद्य
उपाध्यक्ष, औद्योगिक विकास कामगार संघटना

संपादनः विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Can anyone provide space for dumping yard at Hingana MID?