श्रीमंतांचा खाऊ रस्त्यावर; उपराजधानीत ठिकठिकाणी होतेय काजू-बदामची विक्री

नरेंद्र चोरे
Friday, 11 December 2020

काटोल रोडवर सुका मेवा विकणारा आणखी एक युवक रमेश फुलारी म्हणाला, कोरोनापूर्वी मी मिळेल ते काम करून पोट भरायचो. मात्र, कोरोना आल्यानंतर खायचे वांधे झाले. भाजीपाल्याचा धंदा करण्याचा विचार होता. मात्र, अनेकांनी भाजी विकणे सुरू केल्यामुळे मी सुका मेव्याकडे वळलो.

नागपूर : कोरोनामुळे उदरनिर्वाहासाठी तरुण विविध पर्यायी व्यवसाय शोधत आहेत. शहरातील काही बेरोजगार तरुणांनी जागोजागी श्रीमंतांचा खाऊ अर्थात सुका मेवा विक्री सुरू केली आहे. या व्यवसायामुळे अनेकांच्या कुटुंबीयांना मोठा आर्थिक हातभार लाभला आहे.

उपराजधानीचा फेरफटका मारला असता अनेक जण फुटपाथवर कापड अंथरून काजू, बदाम, मनुका, अंजीर विकताना दिसत आहेत. विशेषतः रामदासपेठ, गणेशपेठ, सदर, काटोल रोड, वर्धा रोड, हुडकेश्वर, बेसा, मेडिकल चौक, इमामवाडा, सक्करदरा, गोकुळपेठ आदी भागांमध्ये त्यांनी दुकाने थाटली आहेत. या निमित्ताने नागपूरकरांना काजू-बदाम स्वस्तात तर मिळत आहेच, शिवाय तरुणांच्या हातालाही काम मिळाले आहे.

अधिक माहितीसाठी - राणे दाम्पत्य आत्महत्या प्रकरणाचे गूढ उकलले : कुत्र्याचे इंजेक्शन देऊन पत्नीने केला पती, मुलांचा खून

एरव्ही बाजारात आठशे रुपये किलो मिळणारा काजू कमलेशकडे सहाशे रुपये आहे. तर आठशे रुपये किलोचे बदाम सहाशे रुपयांत. मनुका, अंजीर व इतरही वस्तूही कमी किमतीत विकतो. त्यामुळे केवळ गोरगरीबच नव्हे, कारचालकदेखील आवडीने सुका मेवा खरेदी करतात. कोरोनाच्या भीतीने काही ग्राहक दूर पळत असल्याचा अनुभव त्याने सांगितला. मेहनत करून कमाई करीत असल्याने कमलेश खूश आहे.

काटोल रोडवर सुका मेवा विकणारा आणखी एक युवक रमेश फुलारी म्हणाला, कोरोनापूर्वी मी मिळेल ते काम करून पोट भरायचो. मात्र, कोरोना आल्यानंतर खायचे वांधे झाले. भाजीपाल्याचा धंदा करण्याचा विचार होता. मात्र, अनेकांनी भाजी विकणे सुरू केल्यामुळे मी सुका मेव्याकडे वळलो. कधी दोन हजार, तर कधी चार-पाच हजारांचा धंदा होतो. रोजीरोटी निघते. काही दिवस काजू-बदाम विकल्यानंतर पुन्हा नवा व्यवसाय करेल. माझे अनेक नातेवाईक व मित्र रस्त्यांवर सुका मेवा विकत असल्याचे तो म्हणाला.

क्लिक करा - ऐकावे ते नवलच! खोदकाम बोरवेलचे अन् पाणी निघाले विहिरीतून

राजस्थानमधून करतात खरेदी

कोरोनामुळे हाताला काम नव्हते. त्यामुळे काजू-बदाम विकणे सुरू केले. राजस्थानमधील बंगडापूर येथून ठोक भावाने खरेदी करतो आणि दररोज थोडाथोडा फूटपाथवर बसून विकतो. सध्याचा कोरोनाचा काळ असला तरी, ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुका मेवा महाग आहे. त्यामुळे गोरगरीब सहसा विकत घेण्याची हिंमत करीत नाही. तरीही दररोज हजार ते दोन हजारांची विक्री होत आहे. खर्च वगळता तीनशे ते चारशेची सहज कमाई होते, असे कमलेश सौरव म्हणाला.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cashew almond sales were rampant in the Nagpur