मुख कर्करोग म्हणजे विद्रुप आयुष्य अन् मृत्युशी गाठ

प्रमोद काळबांडे
Tuesday, 6 October 2020

``नागपूर आणि विदर्भच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात तंबाखू, खर्रा, गुटखा, मावा आदी तंबाखूजन्य पदार्थ खाण्याचे प्रमाण मोठे आहे. विशेषतः मजूर आणि कष्टकरी वर्गांतील पुरुष, महिला, तरुण आणि इतकंच काय तर छोटी मुलेही तंबाखू, खर्रा खातात. तरुण वयात तर मुख कर्करोग (ओरल कॅन्सर) खूपच वेगाने वाढू शकतो. कोणत्याही वयोगटात या आजाराची लागण होवू शकते,``

नागपूर : एक वीसेक वर्षांचा तरुण नागपुरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हाॅस्पिटलमध्ये भेटला. त्याचे वडील म्हणाले, `इसको मुहॅं का कॅन्सर हुवा है.` विसाव्या वर्षी एवढा जीवघेणा आजार? कर्करोग साधारणतः चाळिशी पलिकडे होतो, असा समज होता. याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या कर्करोग विभागाचे माजी विभाग प्रमूख आणि या विषयातील सुप्रसिद्ध तज्ज्ञ डाॅ. कृष्णा कांबळे यांना विचारले. त्यांनी धक्कादायक माहिती दिली.

``नागपूर आणि विदर्भच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात तंबाखू, खर्रा, गुटखा, मावा आदी तंबाखूजन्य पदार्थ खाण्याचे प्रमाण मोठे आहे. विशेषतः मजूर आणि कष्टकरी वर्गांतील पुरुष, महिला, तरुण आणि इतकंच काय तर छोटी मुलेही तंबाखू, खर्रा खातात. तरुण वयात तर मुख कर्करोग (ओरल कॅन्सर) खूपच वेगाने वाढू शकतो. कोणत्याही वयोगटात या आजाराची लागण होवू शकते,`` अशी माहिती त्यांनी दिली.

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाचे अहवाल तपासले असता महाराष्ट्रातील किती मोठी लोकसंख्या कर्करोगाला स्वतःहून आमंत्रण देत आहे, हे स्पष्ट झाले. तब्बल दोन कोटी ५८ लाख ९९ हजार २७३ लोक तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी गेलेले आहेत. त्यापैकी ६५ लाख लोक बिडी ओढतात तर, २५ लाख लोक सिगारेट. जवळपास दीड कोटी लोक तंबाखू खातात.

`व्हॉइस ऑफ टोबॅको व्हिक्टिम` ही स्वयंसेवी संस्था अशा रुग्णांसाठी प्रत्यक्षपणे देशभर काम करते. या संस्थेच्या निष्कर्षानुसार नागपूर तर मुख कर्करोगाची राजधानीच ठरू लागली आहे. इतर शहरांच्या तुलनेत नागपूर शहरात कर्करोगावरील उपचार करणाऱ्या रुग्णालयांची संख्या जास्त असल्यामुळे विदर्भासह, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांतूनही रुग्ण उपचारासाठी येतात. कर्करुग्णांपैकी एक तृतियांश रुग्ण अगदी प्राथमिक अवस्थेत मृत्युमुखी पडतात.

डाॅ. कृष्णा कांबळे यांनी दिलेली माहिती आणखीच धक्कादायक आहे. ``जगात सर्वाधिक कर्करुग्णांची संख्या भारतात आहेत. मुख कर्करोग झालेले रुग्ण सरासरी तीन ते सहा महिन्यांहून जास्त काळ जगू शकत नाहीत. या आजाराचा संबंध थेट तोंड, जीभ, गाल, डोळे, नाक या महत्त्वाच्या अवयवांशी येतो. तंबाखू चघळल्यामुळे कर्करोग वेगाने पसरतो. सर्जरी, किमोथेरपी हे उपाय तात्पुरते समाधान देतात. परंतु, त्यामुळे चेहरा अत्यंत विद्रुप होतो. अशा रुग्णांचे उर्वरित सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त होते,`` अशी माहिती त्यांनी दिली.

डाॅ. कृष्णा कांबळे यांनी मुख कर्करोग झालेल्या अनेक रुग्णांची व्यथा सांगितली. एका रुग्णाचा गाल कापावा लागला. त्याजागी दुसरे चामडे लावले. पुढे ते गळून पडले. नंतर तो जे काही अन्नपदार्थ किंवा द्रवपदार्थ तोंडात टाकायचा. ते गालाच्या छिद्रातून बाहेर यायचे. त्याची दुसऱ्यांदा सर्जरी केली. परंतु तो चार-पाच महिन्यांहून जास्त जगू शकला नाही. एका रुग्णालयातील तरुण कर्मचाऱ्याला हाच आजार झाला. त्याची सर्जरी झाली. रोज त्याला दोन हजार रुपयांची एक गोळी घ्यावी लागायची. तोही जास्त काळ जगू शकला नाही.

मृत्यूकडे नेणारी लत सोडावी
तंबाखू खाणाऱ्या सर्वच वयोगटातील लोकांनी मृत्यूकडे नेणारी ही लत ताबडतोब सोडावी. मुख कर्करोग होवू न देणे, हाच एकमेव उपाय आहे. आपल्या तोंडाची तपासणी किमान महिन्यातून एकदा तरी करावी. खूपच प्राथमिक अवस्थेत निदान करता आले तरच काही तरी करता येते.
डाॅ. कृष्णा कांबळे
सुप्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ आणि माजी विभागप्रमुख, मेडिकल हाॅस्टिपल, नागपूर

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cause of Oral Cancer and treament