आनंदवार्ता... महिलांसाठी आरक्षित प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही यंत्रणा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

महिलांची मोठ्या प्रमाणावर भरती झाल्याने महिला आणि मुलांना अधिक सुरक्षा प्रदान करणे आरपीएफला शक्‍य होणार आहे. देशभरात दररोज 13 हजार प्रवासी रेल्वेगाड्या धावतात. त्यातील 4 हजार 500 गाड्यांमध्ये स्काडिंग केले जाते. 

नागपूर  : प्रवासी महिला आणि मुलांना अधिकाधिक सुरक्षा देण्यावर रेल्वे सुरक्षा दलाचा विशेष भर आहे. त्यासाठी आवश्‍यक उपाययोजनाही करण्यात येत आहेत. रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय रेल्वेने घेतला. प्राधान्य क्रमाने महिलांसाठी आरक्षित असणाऱ्या प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील, अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक अरुण कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

आरपीएफमध्ये अलीकडेच 12 हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. त्यात तब्बल 4 हजार 500 महिलांचा समावेश असून, आरपीएफच्या एकूण संख्याबळातील महिलांची संख्या 10 टक्‍क्‍यांपर्यंत आली आहे. एवढ्यात मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश आहे. देशातील कोणत्याही फोर्सच्या तुलनेत महिला संख्येच्या बाबतीत आरपीएफने आघाडी घेतली.

महिलांची मोठ्या प्रमाणावर भरती झाल्याने महिला आणि मुलांना अधिक सुरक्षा प्रदान करणे आरपीएफला शक्‍य होणार आहे. देशभरात दररोज 13 हजार प्रवासी रेल्वेगाड्या धावतात. त्यातील 4 हजार 500 गाड्यांमध्ये स्काडिंग केले जाते. 

रेल्वे सुरक्षा दलाचे लवकरच इंडियन रेल्वे प्रोटेक्‍शन फोर्स सर्व्हिस असे नामकरण केले जाणार असून, ही फोर्स आता "आरपीएफ'ऐवजी "आयआरपीएफएस' नावाने ओळखली जाईल. सहायक उपनिरीक्षकांपेक्षा कमी दर्जाच्या पदावरील कर्मचाऱ्यांना सारखाच गणवेश असतो. आता दहा वर्षांनंतर खांद्यावर दोन फित आणि हवालदार झाल्यावर तीन फित लावता येतील.

त्याद्वारे जवानाचे पद सर्वांना कळू शकेल, शिवाय त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावायलासुद्धा मदत होईल, असे अरुण कुमार म्हणाले. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर सेल सुरू करण्यात आले असून, त्याचा लवकरच विस्तार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला मध्य रेल्वेचे डीआरएम सोमेश कुमार, दपुमरेच्या डीआरएम शोभना बंदोपाध्याय, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्‍त भवानी शंकर नाथ, आशुतोष पांडेय उपस्थित होते. 

अवश्य वाचा - आता सापांनाच म्हणावे लागेल 'सर्पमित्रांना बोलवा'!, कारण वाचून व्हाल अवाक

कोळसा, पेट्रोलवाहू गाड्यांवर उपग्रहाद्वारे लक्ष

 देशाच्या विविध भागात रेल्वेतून जाणारा कोळसा आणि पेट्रोल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येत होत्या. इस्त्रोच्या उपग्रहाच्या मदतीने कोळसा व इंधन वाहून नेणाऱ्या गाड्यांवर लक्ष ठेवले जात आहे. या उपाययोजनेमुळे चोरीच्या घटनांना मोठ्या प्रमाणावर आळा घालणे शक्‍य झाले. चेनपुलिंगसारख्या घटनांना आळा घाळा घालण्यातही मोठ्या प्रमाणावर यश आले. 
 

हल्लेखोरांकडून करणार दंड वसूल

 सीएए, एनआरसीविरोधातील आंदोलनामुळे रेल्वे संपत्तीचे 88 कोटींचे नुकसान झाले. रेल्वेचे नुकसान करणाऱ्यांविरुद्ध आरपीएफने एकूण 54, जीआरपीने 27 आणि स्थानिक पोलिसांनी एक गुन्हा दाखल केला. संबंधित आरोपींची ओळख पटताच त्यांच्याविरुद्ध नागरी दायित्व दावा दाखल करून दंड वसुली करण्यात येईल. त्याची तयारी करण्यात आली असून, हल्लेखोरांविरुद्ध अशाप्रकारे कारवाईची ही पहिलीच वेळ आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CCTV system for every container reserved for women