"देशाटनाची शतपावली' प्रवासवर्णनाचा चित्रमय अलंकार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

कर्नल डॉ. नारायण देशमुख लिखित "देशाटनाची शतपावली' पुस्तकाचे लोकार्पण प्रेसक्‍लब येथे डॉ. जोग यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दै. सकाळचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे तर व्यासपीठावर लाखे प्रकाशनचे चंद्रकांत लाखे, लेखक डॉ. नारायण देशमुख व त्यांच्या पत्नी रोहिणी देशमुख आणि ज्येष्ठ संपादक विनोद देशमुख उपस्थित होते.

नागपूर : प्रवास वर्णनात भौगोलिक माहितीसह शास्त्रीय व कलात्मक सत्य तसेच महत्त्वाच्या नोंदींसह भाषासाहित्य असावे लागते. अमेरिकेच्या वर्णनात जशी खरी अमेरिका नजरेसमोर उभी राहावी तशीच शबरीमालाचे धार्मिक महत्त्व लेखकाला चित्रांकित करता आले पाहिजे. ते कर्नल डॉ. नारायण देशमुख यांना यथायोग्य जमले. "देशाटनाची शतपावली' प्रवासवर्णनाचा चित्रमय अलंकार असल्याचे मत डॉ. जोग यांनी व्यक्‍त केले.

कर्नल डॉ. नारायण देशमुख लिखित "देशाटनाची शतपावली' पुस्तकाचे लोकार्पण प्रेसक्‍लब येथे डॉ. जोग यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दै. सकाळचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे तर व्यासपीठावर लाखे प्रकाशनचे चंद्रकांत लाखे, लेखक डॉ. नारायण देशमुख व त्यांच्या पत्नी रोहिणी देशमुख आणि ज्येष्ठ संपादक विनोद देशमुख उपस्थित होते. प्रवासवर्णनाच्या पुस्तकांमधून वाचकाला जगभ्रमंतीचा आनंद मिळावा, अशी मराठीत सुमारे दोनशेहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. त्या नामवंत लेखकांच्या यादीत डॉ. नारायण देशमुख यांचा समावेश झाला. लोक संपत्तीचा उपयोग केवळ चंगळवादासाठी करीत असल्याची खंत व्यक्त करतानाच डॉ. जोग यांनी आता कर्नल देशमुखांनी युद्धकथांवर पुस्तक लिहावे, असे आवाहन केले.

जगभ्रमंती करणाऱ्यांनाच जगाचे महत्त्व

शैलेश पांडे म्हणाले, प्रवासवर्णनाच्या क्षेत्रात दर्जेदार पुस्तकाची गरज भागवणारे हे पुस्तक आहे. गेले पन्नास वर्षे भारताबाहेर राहिलेल्या कर्नल डॉ. देशमुखांनी पुस्तकाची निर्मिती करून मराठीची सेवा केली. त्यांच्या लिखाणात प्रसन्नता जाणवते. क्षितिजांच्या पलीकडे जाऊन जगभ्रमंती करणाऱ्यांनाच जगाचे महत्त्व कळते. पर्यटन क्षेत्राच्या व्यावसायिकीकरणाने रविवारच्या पुरवणीतून प्रवासवर्णन बाद केले. ते हरवलेले साहित्यमूल्य कर्नल देशमुखांच्या पुस्तकात सापडले आहे.

गुगलवर दडलेल्या अनेक गोष्टी प्रवासवर्णनातून बाहेर येऊ शकतात. ते सगळे अनुभव "देशाटनाची शतपावली' पुस्तकातून वाचकांच्या भेटीला येत असल्याचे कर्नल डॉ. नारायण देशमुख म्हणाले. पुस्तकातील पाठांचे मथळे विनोद देशमुखांनी सुचवले व प्रस्तावना ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशी यांनी लिहिली, यासाठी कर्नल देशमुखांनी दोघांचे आभार मानले. कार्यक्रमाचे निवेदन विनोद देशमुख यांनी केले तर आभार चंद्रकांत लाखे यांनी मानले.

शुभ योग समजावा

पन्नास वर्षे अमेरिकेत राहिलेल्या मराठी व्यक्‍तीने तब्बल 93 देशांची भ्रमंती करून मराठी पुस्तकाची निर्मिती करणे महत्त्वाची घडामोड असल्याचे डॉ. वि. स. जोग म्हणाले. नारदमुनीच्या सांगण्यावरून गणेशाने पृथ्वी प्रदक्षिणा केली. त्याच गणेशाच्या जयंतीच्या शुभमुहूर्तावर कर्नल देशमुखांच्या जगभ्रमंतीचे पुस्तक प्रकाशित झाले, हा शुभ योग समजावा अशा शुभेच्छा डॉ. जोग यांनी दिल्या.

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Centenary of Desatta" A pictorial ornament of travelogue