सत्ता महाविकास आघाडीची; मात्र पालकमंत्री भाजपचाच, वाचा हा घोळ...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 मार्च 2020

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही कनिष्ठ अधिकाऱ्यांना "ऑनलाईन आणि अपडेट' राहण्याचा सल्ला देण्यात येते. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयच आउटडेटेड आहे. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ अनेक महिन्यांपासून अपडेट केले नसल्याचे दिसते.

नागपूर : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर कॉंग्रेसचे डॉ. नितीन राऊत यांची पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली. परंतु, जिल्हाधिकारी प्रशासनाच्या लेखी आजही चंद्रशेखर बावनकुळेच पालकमंत्री आहेत. त्यांचा फोटो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आहे. जिल्हाधिकारी म्हणून रवींद्र ठाकरे यांचा एका ठिकाणी फोटो आहे. दुसऱ्या एका ठिकाणी सचिन कुर्वे यांचा फोटो संकेतस्थळावर आहे. यावरून अपडेट राहण्याचा सल्ला देणारे जिल्हा प्रशासनच आऊटडेट असल्याचे दिसते. 

बाहेरील व्यक्तींना जिल्ह्याची माहिती व्हावी, प्रशासनाची माहिती कळावी, या उद्देशातून प्रत्येक जिल्ह्याचे संकेतस्थळ तयार करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले. त्यानुसार प्रत्येक विभागाने आपले संकेतस्थळ तयार केले आहे. शासन आणि जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी कार्यालय महत्त्वाचे आहे. या संकेतस्थळावर लोकहिताची प्रशासनाच्या दृष्टिकोनातून विशेष करून अधिकाऱ्यांची माहिती अपडेट असणे आवश्‍यक आहे. तशा सूचना शासनाच्या आहेत. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही कनिष्ठ अधिकाऱ्यांना "ऑनलाईन आणि अपडेट' राहण्याचा सल्ला देण्यात येते. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयच आउटडेटेड आहे. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ अनेक महिन्यांपासून अपडेट केले नसल्याचे दिसते. जिल्हाधिकारी कार्यालयाची माहितीसाठी दोन संकेतस्थळ दिसून येतात. 

यातील एका संकेतस्थळावर जिल्हाधिकारी म्हणून सचिन कुर्वे यांचा फोटो असून, पालकमंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो आहे. विशेष म्हणजे कुर्वे यांच्यानंतर अश्‍विन मुद्‌गल जिल्हाधिकारी होते. जवळपास वर्षभर ते या पदावर होते. लोकसभा निवडणूक त्यांच्या काळात पार पडली. तर दुसऱ्या एका संकेतस्थळावर जिल्हाधिकारी म्हणून रवींद्र ठाकरे यांचा फोटो दर्शविण्यात आला आहे. या संकेतस्थळावर जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची माहिती आहे. परंतु, ही माहितीही चुकीची आहे. 

क्लिक करा -  मुंढे साहेब, हे अतिक्रमण काढण्याची हिंमत दाखवाच...

ऑनलाइन कारभार हवेत

पुनर्वसन जिल्हाधिकारी पदावर आशा पठाण आहे. संकेतस्थळावर अविनाश कातडेच आहे. तहसीलदार प्रिया काळे यांची बदली झाली आहे. शहर पुरवठा अधिकारी सवई असताना संकेतस्थळावर प्रशांत काळेच दर्शविले आहे. लीलाधर वार्डेकर निवृत्त झाले असताना ते अद्याप कायम आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनचा ऑनलाइन कारभार हवेत असल्याचे दिसते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrashekhar bawankule guardian minister for the Collector's Office