ठकबाज प्रीती दास जेलमध्ये क्वारंटाइन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जून 2020

नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरातील युवक आणि बड्या असामींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे लाटणारी प्रिती दास आता तुरूंगात गेली आहे. ती तुरूंगात क्वारंटाईन होणार आहे.

नागपूर : "लुटेरी दुल्हन' प्रीती दासची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. जेल प्रशासनाने कोरोनाच्या महामारीमुळे प्रीतीला विशेष यार्डात क्वारंटाइन केले आहे. तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तीन महिला जेल कर्मचाऱ्यांना तैणात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी प्रीती दासच्या फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला आहे. पोलिस उपायुक्‍त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात तपास होत असल्यामुळे आता प्रीतीशी संबंधित असलेल्या राजकीय आणि पोलिस खात्यात असलेल्या अनेकांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. गुड्‌डू तिवारीला लग्नाचे आमिष दाखवून 14 लाख रुपयांनी फसवणूक प्रकरणात प्रीतीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

वाचा- कोरोना ब्रेकिंग : जबलपूरच्या व्यक्‍तीचा नागपुरात मृत्यू, एकूण बाधित 1298

त्याच गुन्ह्यात प्रीतीला मध्यवर्ती कारागृहात जावे लागले आहे. जेल प्रशासनाने कोरोनाचे संकट पाहता प्रीतीला कारागृहातील एका विशेष यार्डात ठेवले क्‍वारंटाइन केले आहे. प्रीतीची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. कच्चा कैदी म्हणून तिला आता कारागृहात ठेवण्यात येणार आहे.

प्रीतीचे "वजन' घटले

प्रीती दास ही हायप्रोफाइल व्यक्‍तिमत्त्व म्हणून समाजात वावरत होती. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत तिचे उठणे-बसणे होते. मात्र, तिला अटक होताच तिचे "वजन' घटले. तिच्या वाचविण्यासाठी धडपड करणारे काही कार्यकर्ते आणि पोलिस अधिकाऱ्यांनी प्रीतीपासून दुरावा निर्माण केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cheater Priti Das quarantined in prison