उष्माघाताची टांगती तलवार; ना उद्याने सुरू, ना पाणपोई केंद्र

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

उष्माघाताचे मृत्यू कमी करण्यासाठी हीट ऍक्‍शन प्लानची अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे. यासंदर्भात राज्य सरकारचे निर्देशही आहेत. महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने दरवर्षी यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येतात. परंतु, कोरोनाविरुद्धच्या लढ्याला प्राधान्य देत महापालिकेने 47 अंश सेल्सिअस तापमानातही हीट ऍक्‍शन प्लानच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले.

नागपूर : लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्याने नागरिक आता रस्त्यावर आले आहेत. पारा चढला असला, तरी रिक्षाचालकांपासून तर घरापर्यंत विविध उत्पादने पोहोचविणारे भर उन्हात फिरत आहेत. परंतु, साधे पाणपोई केंद्र सुरू नसल्याने त्यांच्यावर उष्माघाताची टांगती तलवार आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्याला प्राधान्य देत महापालिकेने "हीट ऍक्‍शन प्लान' थंडबस्त्यात टाकल्याचे चित्र आहे. 

मागील आठवड्यात शहराचे तापमान 47 अंश सेल्सिअसपर्यंत गेले. त्यानंतर घट झाली असली तरी उन्हाची तीव्र दाहकता आहे. गेल्या काही दिवसांत लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्याने दुकानदार, नागरिक, रिक्षाचालक, ऑटोचालकही रस्त्यावर आले आहेत. नागरिकांचा उष्माघातापासून बचाव करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून महापालिका तापमान 43 अंशापेक्षा जास्त झाल्यास हीट ऍक्‍शन प्लानची (उष्माघात कृती आराखडा) अंमलबजावणी करीत आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे महापालिकेला उष्माघात कृती आराखड्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. 

उष्माघाताचे मृत्यू कमी करण्यासाठी हीट ऍक्‍शन प्लानची अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे. यासंदर्भात राज्य सरकारचे निर्देशही आहेत. महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने दरवर्षी यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येतात. परंतु, कोरोनाविरुद्धच्या लढ्याला प्राधान्य देत महापालिकेने 47 अंश सेल्सिअस तापमानातही हीट ऍक्‍शन प्लानच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे उन्हात फिरणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी एकही उद्यान सुरू करण्यात आले नाही. एवढेच नव्हे तर साधे पाणपोई केंद्रही रस्त्यावर सुरू नाही. त्यामुळे उन्हात कामानिमित्त फिरणारे नागरिक, रिक्षाचालक हॉटेल, रेस्टॉरंट, टपरी बंद असल्याने भर उन्हात पाण्यासाठी भटकत आहेत. 

भर दुपारी बांधकाम 
हीट ऍक्‍शन प्लाननुसार दुपारी 12 ते 3 या वेळेत बांधकाम बंद करण्याचे बंधनकारक आहे. परंतु, हीट ऍक्‍शन प्लानची अंमलबजावणी सुरू नसल्याने बांधकाम मजूर 47 अंश सेल्सिअस तापमानातही काम करताना दिसून येत आहे. 

दुकानेही सुरू 
लॉकडाउन शिथिल झाल्याने अनेक दुकाने सुरू झाली आहेत. दुपारी 12 ते 3 या वेळेत दुकानेही बंद ठेवणे आवश्‍यक आहे. परंतु, हीट ऍक्‍शन प्लानची अंमलबजावणीच होत नसल्याने भर उन्हात दुकाने सुरू आहे. 

प्याऊ गायब 
शासकीय कार्यालय, शासकीय व खासगी दवाखाने, पेट्रोल पंप या ठिकाणी पाणी प्याऊ लावण्याचे महापालिकेने आवाहन केले नसल्याने कुठेही ते दिसून येत नाही. परिणामी भर उन्हात नागरिकांना घरी किंवा कार्यालयात पोहोचेपर्यंत कुठेही पाणी मिळत नाही. 

हेही वाचा : आशा वर्करच्या वेतनाची माहिती द्या : उच्च न्यायालय 

स्वयंसेवी संस्था पेचात 
अनेक स्वयंसेवी संस्था दरवर्षी मोठ्या प्रमाणात नागरिकांसाठी प्याऊ सुरू करतात. परंतु यंदा कोरोनामुळे परवानगी मिळेल की नाही, या पेचात स्वयंसेवी संस्था पडल्या आहेत. याबाबत महापालिकेने कुठलीही भूमिका स्पष्ट केली नाही. 

एसएमएसही बंदही 
हीट ऍक्‍शन प्लाननुसार उष्मालहरीबाबत नागरिकांना सावध करणे, त्यांच्यात जनजागृती करण्याबाबत एसएमएस करणे आवश्‍यक आहे. परंतु यावर्षी महापालिकेने किंवा हवामान खात्याने एकही एसएमएस नागरिकांना पाठविला नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens at risk of heatstroke