काय म्हणाले आयुक्त मुंढे लॉकडाउनसंदर्भात? वाचा

राजेश प्रायकर
बुधवार, 15 जुलै 2020

 आयुक्तांनी एक व्हिडिओ प्रसारित करून नागरिकांना लॉकडाउनचा इशारा दिला होता. दुकाने सुरू करण्यासंदर्भातील तसेच मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे कुठलेही नियम पाळले जात नाही. अनेक जण विनाकारण शहरात बिनधास्त फिरत आहे. दुचाकींवर दोन व्यक्ती तर चारचाकी वाहनांत पाच-पाच व्यक्ती फिरत आहे, असे निरीक्षण नोंदवित त्यांनी कठोर निर्णयाचे संकेत दिले होते. 

नागपूर : लॉकडाउनचा निर्णय अद्याप घेतला नसल्याचे नमूद करीत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात गेल्या दोन दिवसांपासून लॉकडाउन होणार असल्याच्या अफवांना पूर्णविराम दिला. मात्र, लॉकडाउन शिथिल केल्यानंतरही कोरोनावर नियंत्रणासाठी दिलेल्या सूचना, निर्देशाचे पालन होत नाही. लॉकडाउन टाळण्यासाठी नागरिकांनी नियम पाळावे, असे आवाहन त्यांनी "सकाळ'सोबत बोलताना पुन्हा एकदा केले. 

लॉकडाउन होणार असल्याची काल, सोमवारपासून अफवा पसरली आहे. या अफवेमुळे नागरिकच नव्हे तर व्यापारीही धास्तावले आहे. केवळ काही दिवसांमध्येच पुन्हा लॉकडाउनच्या संकटाने अनेकजण हादरले. व्यापारी, उद्योजक, कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचाऱ्यांमध्येही लॉकडाउनबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.

अनेकांनी आज संपर्कातील अधिकारी किंवा नातेसंबंधातील अधिकारी, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना फोन करून लॉकडाउनबाबत विचारणा केली. अनेकांच्या चर्चेतून पुन्हा लॉकडाउन परवडणारे नसल्याचा सूर निघाला. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनीही या अफवांवर विश्‍वास ठेवून लॉकडाउनपूर्वीच घरात किराणा आदी भरून ठेवण्यास प्रारंभ केला.

याबाबत आयुक्त मुंढे यांना विचारणा केली असता त्यांनी लॉकडाउनचा निर्णय अद्याप घेतला नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, "मिशन बिगीन अगेन'अंतर्गत नागरिकांना दैनंदिन व्यवहार सुरू करण्याची सूट देण्यात आली. परंतु, नागरिकांकडून लॉकडाउनसंदर्भातील निर्देश, सूचनांचे पालन होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

लॉकडाउन टाळायचा असेल तर नियमाचे पालन करा, असे आवाहन त्यांनी नागरिक, दुकानदार, संस्था, कार्यालय प्रमुखांना केले. दोन दिवसांपूर्वीच आयुक्तांनी एक व्हिडिओ प्रसारित करून नागरिकांना लॉकडाउनचा इशारा दिला होता. दुकाने सुरू करण्यासंदर्भातील तसेच मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे कुठलेही नियम पाळले जात नाही.

वाचा, महापालिकेला किती कर्मचाऱ्यांनी खेचले कोर्टात?

अनेक जण विनाकारण शहरात बिनधास्त फिरत आहे. दुचाकींवर दोन व्यक्ती तर चारचाकी वाहनांत पाच-पाच व्यक्ती फिरत आहे, असे निरीक्षण नोंदवित त्यांनी कठोर निर्णयाचे संकेत दिले होते. 

नागरिकांवर "वॉच' 
लॉकडाउनचा निर्णय घेण्याअगोदर मनपा आणि पोलिस प्रशासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर "वॉच' ठेवणार असल्याचे आयुक्तांनी नुकताच प्रसारित केलेल्या व्हिडिओतून सांगितले होते. त्यामुळे काल, सोमवारपासून नागरिकांवर लक्ष ठेवण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे नागरिकांनी नियमाचे पालन केल्यास लॉकडाउनचे संकट टाळणे शक्‍य आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Commissioner Munde said about the lockdown