...आणि आयुक्त तुकाराम मुंढे पोचले जनतेत; केले हे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

यासंदर्भातील नियम मनपा आयुक्तांनी नव्हे, केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने तयार केले आहे. नागरिकांच्या आरोग्यविषयक सुरक्षेच्या दृष्टीने हा नियम असल्याचे नमूद करीत नागरिकांनी नागरिकांसाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

नागपूर : सत्ताधारी व विरोधी पक्षनेत्याने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन प्रहार केल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थेट जनतेलाच सहकार्याचे आवाहन केले. एवढेच नव्हे, तर 'भूलथापांना बळी पडू नका', असे आवाहन करीत अप्रत्यक्षपणे सत्तापक्ष व विरोधी पक्षनेते थापा मारत असल्याकडेही नागरिकांचे लक्ष वेधले. 

पॉझिटिव्ह रुग्ण आढळतात, तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येतो. यासंदर्भातील नियम मनपा आयुक्तांनी नव्हे, केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने तयार केले आहे. नागरिकांच्या आरोग्यविषयक सुरक्षेच्या दृष्टीने हा नियम असल्याचे नमूद करीत नागरिकांनी नागरिकांसाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. सत्तापक्ष नेते संदीप जाधव व विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेतून आयुक्तांवर हल्ला चढविला होता. त्यानंतर काही तासांमध्येच आयुक्तांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे सत्ताधारी व विरोधक, या दोघांवरही अप्रत्यक्ष प्रहार केला.

केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाच्या 17 मे रोजी आलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार संबंधित परिसरात अखेरचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला त्या दिवसापासून पुढील 28 दिवस ते क्षेत्र प्रतिबंधित राहील. या मार्गदर्शक तत्त्वानुसारच नागपुरात अंमलबजावणी सुरू आहे. हे निर्णय शासनाचे आहेत. 28 दिवसाला 14 आणि 14 अशा दोन भागांत वैद्यकीयदृष्ट्या विभागण्यात आले आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या परिसरातील 95 टक्‍के लोकांना 2 ते 14 दिवसांत कोरोनाची लागण होऊ शकते. उरलेल्या पाच टक्‍क्‍यांपैकी अडीच टक्‍के लोकांना 0 ते 2 दिवसादरम्यान तर उर्वरित अडीच टक्‍के लोकांना 14 व्या दिवसानंतर 28 व्या दिवसापर्यंत लागण होण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा : आशा वर्करच्या वेतनाची माहिती द्या : उच्च न्यायालय 

या अडीच टक्‍क्‍यांच्या शक्‍यतेमुळे 28 दिवस संबंधित क्षेत्र प्रतिबंधित ठेवणे आवश्‍यक असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वाचा कुणीही विपर्यास करू नये. शहर लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन कायमस्वरूपी ग्रीन झोनमध्ये यावे, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहनही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Commissioner Mundhe appesled to the people for cooperation