आयुक्‍त मुंढेंचे आदेश, उपराजधानीत पाच जूनपासून सुरू होणार ही दुकाने...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

राज्य सरकारने काल, रेड झोनमधील महापालिका क्षेत्रातही काही बाबींना टप्प्या-टप्प्याने सुरू करण्याचे आदेश काढले. आज आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील दुकानदार तसेच नागरिकांना दिलासा देणारे आदेश काढले.

नागपूर : शहरात 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला. मात्र, प्रतिबंधित क्षेत्रवगळून इतर भागातील नागरिक, दुकानदार, खाजगी कार्यालयांना टप्प्या-टप्प्याने दिलासा देण्यात आला आहे. 3 जूनपासून शहरातील उद्याने, 5 जूनपासून रस्त्याच्या एका बाजूची पूर्ण दुकाने तर 8 जूनपासून खाजगी कार्यालये सुरू होतील. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज याबाबत आदेश काढले. प्रतिबंधित क्षेत्रात मात्र लॉकडाऊनचे कडक पालन केले जाणार असून, तेथे कुठलीही सूट दिली नाही.

राज्य सरकारने काल, रेड झोनमधील महापालिका क्षेत्रातही काही बाबींना टप्प्या-टप्प्याने सुरू करण्याचे आदेश काढले. आज आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील दुकानदार तसेच नागरिकांना दिलासा देणारे आदेश काढले. या आदेशाची अंमलबजावणी 3 जूनपासून होणार आहे. परंतु प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊनचे कडक पालन केले जाणार असून, तेथे सध्या कोणतीही सूट देण्यात आलेली नाही.

वर्धेतील युवकाने तयार केली टचलेस हॅण्ड सॅनिटायझर मशीन

चौथ्या लॉकडाउनमध्ये शहर रेड झोनमध्ये होते. आता पाचवा लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढविण्यात आला असला तरी रेड झोनमधील नागपूर शहरात काही सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 3 जूनपासून खाजगी, सरकारी मैदाने उद्याने सुरू होणार असून नागरिकांना सकाळी 5 ते सायंकाळी 7 याकाळात आरोग्याच्या दृष्टीने सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, वॉकिंगसाठी परवानगी आहे. मात्र मैदान, उद्यानांत समूहाने फिरणे, व्यायाम करण्यासारखी कुठलीच कृती करता येणार नाही. लहान मुलासोबत पालकांना राहणे आवश्‍यक आहे.

दुसऱ्या टप्प्यात 5 जूनपासून रस्त्याच्या एका बाजूची सर्व दुकाने दिवसाआड सुरू ठेवता येईल. यासाठी सकाळी 9 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतची वेळ निश्‍चित करण्यात आली आहे. टॅक्‍सी, कॅब आणि रिक्षा यांनाही 5 जूनपासून परवानगी असेल. मात्र यात चालक आणि दोन प्रवासी राहतील. खासगी कार्यालयांना 8 जूनपासून कामास सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. मात्र कामाच्या ठिकाणी केवळ 10 टक्के कर्मचाऱ्यांना काम करू देण्यास परवानगी असेल. इतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करावे लागेल.

 

5 जूनपासून दुसरा टप्पा

 

  • मार्केट कॉम्प्लेक्‍स, मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट वगळवून सर्व दुकानांना परवानगी.
  • रस्त्याच्या एका बाजूची दुकाने एका दिवशी तर दुसऱ्या बाजूची दुकाने दुसऱ्या दिवशी सुरू राहतील. वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत.
  • कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रूम बंद राहील. कोणत्याही प्रकारच्या कपडे बदलून किंवा परत घेता येणार नाही.
  • लोकांना जवळच्या दुकानांचा वापर करणे बंधनकारक. अत्यावश्‍यक नसलेल्या वस्तुंसाठी दूरच्या दुकानात जाण्यास परवानगी नाही.
  • टॅक्‍सी, कॅब आणि रिक्षाला चालक आणि दोन प्रवाशांसह परवानगी. दुचाकीवरून एकाच व्यक्तिला प्रवास करता येईल.

 

8 पासून तिसरा टप्पा

 

  • तिसऱ्या टप्प्यात खाजगी कार्यालयांना केवळ 10 टक्के कर्मचाऱ्यांसह काम करण्यास परवानगी. इतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करावे लागेल.
  • ऍम्बुलन्स, डॉक्‍टर, नर्स, वैद्यकीय क्षेत्रातील अधिकाऱ्यांना राज्यात, राज्याबाहेर कुठेही प्रवासाला परवानगी.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CommissionerTukram Mundhe sayas These shops will start from June 5 in nagpur