आयुक्त तुकाराम मुंढेंवरून महापालिकेत हा पक्ष गोंधळात 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

महापालिकेच्या नुकताच पार पडलेल्या पाचदिवसीय सर्वसाधारण सभेत कॉंग्रेस सदस्य नितीन साठवणे यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीवर संताप व्यक्त करीत चर्चेसाठी स्थगन प्रस्ताव दिला. या प्रस्तावावर सलग चार दिवस सभा सुरू होती. सत्ताधारी बाकावरील सर्वच सदस्यांसह कॉंग्रेसच्या काही सदस्यांनी आयुक्तांवर रोष व्यक्त केला.

नागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कॉंग्रेसच्या काही नगरसेवकांनी बचाव केला. काही नगरसेवकांनी आयुक्तांच्या कार्यशैलीवर टीकास्त्र सोडत विकासकामे थांबविल्यामुळे स्पष्टपणे विरोध केला. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी भाषणातून विरोध करतानाच आयुक्तांचे स्वागतही केले. एवढेच नव्हे, तर त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले अन्‌ सत्ताधाऱ्यांनी बाक वाजविली. एकूणच आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरून महापालिकेत कॉंग्रेस पूर्णपणे गोंधळात असल्याचे चित्र आहे. 

महापालिकेच्या नुकताच पार पडलेल्या पाचदिवसीय सर्वसाधारण सभेत कॉंग्रेस सदस्य नितीन साठवणे यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीवर संताप व्यक्त करीत चर्चेसाठी स्थगन प्रस्ताव दिला. या प्रस्तावावर सलग चार दिवस सभा सुरू होती. सत्ताधारी बाकावरील सर्वच सदस्यांसह कॉंग्रेसच्या काही सदस्यांनी आयुक्तांवर रोष व्यक्त केला. एवढेच नव्हे, प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी महाराष्ट्र महापालिका कायद्यात आयुक्तांवर कारवाईचे अधिकार सभागृहाला नसेल तर अविश्‍वास आणावा, असे आव्हानच सत्ताधाऱ्यांना दिले.

अधिक माहितीसाठी - मोठी बातमी : युवकाचा 'फिल्मी स्टाईल'ने तलवारीने भोसकून खून

कॉंग्रेसचे बंटी शेळके व कमलेश चौधरी यांनी आपल्या भाषणातूनच नव्हे, तर बाहेर समर्थनात नारे लावून आयुक्तांचा बचाव केला. आयुक्तांच्या भाषणादरम्यान प्रवीण दटके यांनी व्यत्यय आणल्याने कमलेश चौधरी यांनी आक्रमक होऊन आयुक्तांची बाजू लावून धरली. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक संदीप सहारे, हरीश ग्वालवंशी, रमेश पुणेकर व संजय महाकाळकर यांनी आयुक्तांवर थेट शरसंधान साधले. सहारे यांनी जनतेची कामे करीत असताना नगरसेवकांवर गुन्हा दाखल केला, त्याप्रमाणे पालिकेतील अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांचे पुरावे असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून दाखवा, असे आव्हान आयुक्तांना दिले. 

ग्वालवंशी यांनी मीपणा लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे नमुद करीत आयुक्तांना टोला हाणला. रमेश पुणेकर यांनी नगरसेवकावर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी आयुक्तांनी माफी मागावी, अशी मागणी केली. संजय महाकाळकर यांनी तर महापौरांना आयुक्तांविरोधात अविश्‍वास ठरावासाठी पत्र दिले. कॉंग्रेसमधील नगरसेवकांच्या भूमिका वेगवेगळ्या दिसून आल्या. 

मात्र, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या भाषणातून ते आयुक्तांचा विरोध करीत आहे की समर्थन हेच अनेकांना कळले नाही. बाहेरून विमानाने आलेल्या लोकांना विमानतळावर क्वारंटाइन न केल्याने कोरोनाचा प्रसार झाल्याचे नमूद करीत त्यांनी आयुक्तांवर प्रहार केला. त्याच वेळी त्यांनी आयुक्तांच्या कामाचेही कौतुक केले. यावेळी त्यांनी महापालिकेची आर्थिक स्थिती वाईट असताना जीएसटीमध्ये वाढ करून दिल्याबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. त्याच वेळी प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना आपल्या भाषणातून थेट लक्ष्य केले. 

 
स्थगन मागे घेण्याबाबत पत्रानंतर सभागृहात समर्थन 

विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी नगरसेवक नितीन साठवणे यांना स्थगन प्रस्ताव मागे घ्यावा; अन्यथा पक्षशिस्तीबाबत कारवाईचा इशारा पत्रातून दिला. मात्र, साठवणेंवरील गुन्हा मागे घ्यावा, गुन्हा दाखल करणे योग्य नाही, असे नमूद करीत त्यांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress confused over Commissioner Tukaram Mundhe in Nagpur NMC