Video : तुकाराम मुंढे हुकुमशाहसारखे वागतात, नागपुरातील या कॉंग्रेसे आमदाराने डागली तोफ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

विकास ठाकरे यांनी शनिवारी सकाळ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते म्हणाले, मुंढे यांना वैयक्तिक विरोध करीत नाही. मात्र ते ज्या पद्धतीने वागतात, काम करतात त्याला माझा विरोध आहे. मी त्यांच्याकडे लोकांच्या तक्रारी आल्यावर लोकप्रतिनिधी म्हणून जातो. त्या समजून घेण्याऐवजी आपणच कसे बरोबर आहोत यावरच त्यांचा भर असतो.

नागपूर : लोकप्रतिनीधींचे ऐकायचे नाही, जनतेच्या अडचणी समजून घ्यायच्या नाही, प्रतिबंधित क्षेत्राच्या नावाखील लोकांना महिनाभर डांबून ठेवायचे, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करायची नाही आणि भक्तांमार्फत सोशल मीडियावर स्वतःला नागपूरचा राजा म्हणून घ्यायचे, असे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचे धोरण आहे. त्यामुळे असा हेकेखोर राजा आम्हाला नको आहे. याचा हिशेब आपण अधिवेशनात घेऊ असा इशारा कॉंग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी दिला.

 

विकास ठाकरे यांनी शनिवारी सकाळ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते म्हणाले, मुंढे यांना वैयक्तिक विरोध करीत नाही. मात्र ते ज्या पद्धतीने वागतात, काम करतात त्याला माझा विरोध आहे. मी त्यांच्याकडे लोकांच्या तक्रारी आल्यावर लोकप्रतिनिधी म्हणून जातो. त्या समजून घेण्याऐवजी आपणच कसे बरोबर आहोत यावरच त्यांचा भर असतो.

कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर ट्रस्ट ले-आऊटसह सुमारे पाच किलोमीटरचा परिसर त्यांनी बंद केला. त्याआधी लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या अडचणी, गैरसोयी जाणून घेतल्या नाहीत. डॉक्‍टर्स, परिचारिका, अधिकारी, कर्मचारी यांनाही बाहेर पडू दिले नाही. नियमानुसार लॉकडाऊन करताना तेथील नागरिकांना सोयीसुविधा पुरवाव्या हा नियम आहे. तो त्यांनी मान्य केला नाही. आता ट्रस्ट ले-आऊट वगळून इतर वस्त्यांना प्रतिबंधित क्षेत्रातून वगळले. हीच मागणी आपण करीत होतो. आता कोण चुकले हे मुंडे यांनीच सांगावे.

अवश्य वाचा - ब्रेकिंग...मुंबईवरून आलेल्या कोरोनाग्रस्ताचा यवतमाळात मृत्यू

पब्लिसिटी क्रेझी

मुंढे पगारी नोकरदार आहे. राज्य सरकारच्या सर्व सोयीसुविधा घेतात. सरकारच्याच योजनांची त्यांना अंमलबजावणी करायची असते. मात्र ते मुंढे पॅटर्न म्हणून स्वतःचा प्रचार करतात. राज्यात महाआघाडीचे सरकार आहे. याचे श्रेयही ते सरकारला देत नाही. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी त्यांनी एजन्सी नियुक्त केली आहे. यावर त्यांचे भक्त वेगवेगळ्या पोजचे फोटो टाकतात. "नागपूरचा राजा' म्हणतात. यावर त्यांनी सरकारचा प्रतिनिधी म्हणून कधी आक्षेप घेतला नाही. सरकारची नोकरी करतो असे म्हटले नाही. यावरून सर्वच मुंढेंच्या सहमतीने सुरू असल्याचे स्पष्ट होते. एवढीच प्रसिद्धी आणि समाजसेवेची खुमखुमी असेल तर मुंढे यांनी नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात यावे, असेही ठाकरे म्हणाले.

गुन्हे दाखल करण्याच्या धमक्‍या

कॉंग्रसेच्या एका नगरसेवकाने नागरिकांना विलिकरणासाठी दोन तासाची मुदत मागितली होती. मात्र मुंढे यांच्या आदेशावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आपणावरसुद्धा गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. पालकमंत्री, महापौर, आमदारांचेही ते ऐकत नाही. रचना अपार्टमेंट येथील एक इमारतील त्यांनी क्वारंटाईन सेंटर सुरू केले. याच इमारतीला लागून असलेल्या फ्लॅटमध्ये दीडशे कुटुंब राहातात. त्यांचा विरोध स्वाभाविक होता. मात्र त्यांनाही हाकलून लावले, असे ठाकरे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress mla alligation tukaram mundhe behaves like dictator