पारशिवनीत नळांतून येतेय पिवळे पाणी; कोण खेळत आहे नागरिकांच्या जिवाशी? 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जून 2020

काही दिवसांपूर्वी नळाद्वारे काळे पाणी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. आता पिवळ्या रंगाचे दूषित व गढूळ पाणी नळातून येत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

पारशिवनी (नागपूर) : कोरोना विषाणूमुळे नागरिक आधीच दहशतीत आहेत. त्यातच साथीचे आजारही तोंड वर काढत आहेत. आता पारशिवनीवासींना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. नळाद्वारे पिवळे गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे रोष व्यक्त करण्यात येत आहे. 

नुकताच पावसाळा सुरू झाला. जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. हा काळ आनंदाचा असला, तरी याचदरम्यान अनेक आजार उद्‌भवतात. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची आवश्‍यकता असते. आधीच कोरोनाचा कहर सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. आता पारशिवनीवासींनी भलत्याच समस्येने ग्रासले आहे. पाणीपुरवठा योजनेच्या नळांतून पिवळे पाणी निघत असल्याने आजार पसरण्याची भीती आहे. 

शहरात नळांद्वारे दूषित पाणीपुरवठा होत असल्याची ओरड आहे. या पाण्यावरच तहान भागविण्याशिवाय पर्याय नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
याबाबत नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयात तक्रार देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

शहरात पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. नगरपंचायतीच्या माध्यमातून नळाद्वारे घरोघरी पाणी पुरविले जाते. काही दिवसांपूर्वी नळाद्वारे काळे पाणी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. आता पिवळ्या रंगाचे दूषित व गढूळ पाणी नळातून येत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. नगरपंचायत नागरिकांच्या जिवाशी खेळ करीत असल्याचा आरोप करण्यात आला. 

हेही वाचा : प्रेमविवाहाचा करुण अंत; गर्भपात झाल्याने विवाहितेने केले असे... 

याबाबत नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयात लेखी तक्रार सादर करून नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या व पाणीपुरवठा करणाऱ्यावर कारवाईची मागणी केली. पिण्याच्या पाण्यासंबंधी तक्रारी असताना पाणीपुरवठा समितीही गप्प आहे. याबाबत अतिरिक्‍त मुख्याधिकारी खरंगे यांना विचारले असता मला माहीत नाही. मीटिंगला जायचे आहे, असे बेजबाबदारपणाचे उत्तर देतात. यावरून त्यांना शहरवासींची किती काळजी आहे हे दिसून येते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Contaminated water comes to the taps