सरपंचांसह कुटुंबीयांना कोरोनाची बाधा; हिंगणा एमआयडीसी ठरतेय हॉटस्पॉट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जून 2020

हिंगणा एमआयडीसी परिसरात अमरनगर व इसासनी परिसरातील भीमनगर या दोन मोठ्या झोपडपट्ट्या आहेत. यामध्येच कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

हिंगणा (जि. नागपूर) : हिंगणा एमआयडीसी परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. एमआयडीसीतील झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधित क्षेत्राची शुक्रवारीच पाहणी केली होती. शनिवारी निलडोह येथील सरपंचासह कुटुंबातील आठ जणांना कोरोना झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामुळे हिंगणा एमआयडीसी परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरणार काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

हिंगणा तालुक्‍यात प्रथम कोरोनाचा रुग्ण लोकमान्यनगर परिसरात आढळून आला. वृद्ध व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यानंतर लोकमान्यनगरात सहा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. गजानननगर, पारधीनगर, इसासनी मधील भीमनगर, वागदरा यासह निलडोह परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला. 12 जूनपर्यंत हिंगणा तालुक्‍यात 23 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते.

नागपूरच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर, उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांच्या पथकाने एमआयडीसी परिसरातील प्रतिबंधीत क्षेत्राची पाहणी केली होती. महसूल, आरोग्य व पंचायत समिती प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्यात आल्या होत्या.

नीलडोह सरपंचांच्या पतीला कोरोना झाला होता. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. याचा अहवाल शनिवारला आला. सरपंचासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य, भाडेकरू व ग्रामपंचायतमधील चपराशी असे आठ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल वैद्यकीय विभागाला प्राप्त झाला आहे. यामुळे अमरनगर परिसरात प्रशासनाची चमू सकाळी दाखल झाली. कोरोना रुग्ण आढळलेला परिसर सील करण्याची कारवाई सुरू आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण एमआयडीसीतील एका कंपनीत कार्यरत होता. यामुळे या कंपनीतील कामगारांनही कोरोना झाला असावा, असा संशय बळावला आहे. सरपंचाच्या घरी राहणारा भाडेकरूही एका कंपनीत कार्यरत आहे. यामुळे त्याच्या संपर्कातही अनेक कामगार आल्याचे बोलले जात आहे.

बघा, बळीराजा कसा करतोय पेरणीची तयारी

हिंगणा एमआयडीसी परिसरात अमरनगर व इसासनी परिसरातील भीमनगर या दोन मोठ्या झोपडपट्ट्या आहेत. यामध्येच कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता हिंगणा एमआयडीसी परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट भविष्यकाळात ठरणार का अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

नागपूर जिल्ह्यात हिंगणा तालुका आघाडीवर
नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 13 तालुके आहेत. हिंगणा एमआयडीसी सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे. हिंगणा तालुक्‍यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 31 वर पोहोचली आहे. तालुका कोरोनाच्या बाबतीत जिल्ह्यात आघाडीवर आहे. या वसाहतीतील 60 टक्के कंपन्या सुरू झाल्या आहेत. या कंपन्यांमध्ये शंभर टक्के कामगार कामावर येत आहेत. जिल्हा प्रशासनाने उद्योगांच्या व्यवस्थापनाला हाताशी धरून परवानग्या दिल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. कंपन्यांमध्येही सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडत आहे. याकडे जिल्हाधिकारी महोदयांनी दुर्लक्ष केल्याने त्यांना एमआयडीसी परिसर कोणाचा हॉटस्पॉट होणार एवढे मात्र निश्‍चित.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patients found in rural areas of Nagpur