लॉकडाउन शिथिल करणे नागपूरला पडले महागात... वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जून 2020

नागपुरात अकोला, अमरावती येथून रुग्ण हलवण्याच्या निर्णयानंतर तेथून शहरात इतर आजाराचे रुग्णही हलवण्याचे प्रमाण वाढले. यातूनच कोरोनाबाधितांचाही आकडा वाढत आहे.

नागपूर : उपराजधानीत चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या कमी होती. एकाच आकड्यात मृत्यू होते. मात्र, लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर अकोला, अमरावतीसह इतर जिल्ह्यातून मेडिकल-मेयोत रुग्णांना रेफर करण्यात येत आहे. यामुळे मेयो, मेडिकलमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा फुगत आहे. तसेच मृत्यूचा टक्काही वाढत आहे.

विशेष असे की, कोरोनाचा मृत्युदर कमी करण्यासाठी नागपुरातील तज्ज्ञ डॉक्‍टरांचे पथक अमरावती आणि अकोला जिल्ह्यात निरीक्षणाला गेले होते. तेथे उपचाराचा दर्जा वाढण्याऐवजी तेथून नागपूरच्या मेडिकल, मेयोत अत्यावस्थ व गंभीर रुग्णांना नागपुरात हलवण्याचे प्रमाण वाढले. यामुळे नागपुरात कोरोनाबाधितांची नागपुरात नोंद होत असून येथे संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. मेयो, मेडिकलमध्ये कोरोनाच्या बाधेने 17 मृत्यू झाले आहेत, अशी नोंद आहे. यातील पाच मृत्यू बाहेरच्या रुग्णांचे आहेत. रेफर रुग्णांमुळेच नागपुरातील मृत्युदर वाढला आहे. नागपुरात अकोला अमरावती येथून हलवण्याच्या या निर्णयानंतर तेथून शहरात इतर आजाराचे रुग्णही हलवण्याचे प्रमाण वाढले. यातूनच कोरोनाबाधितांचाही आकडा वाढत आहे.

मानव संसाधन व्यवस्थापक भगवान श्रीकृष्ण

रेफर रुग्णांमुळे कोरोनाबाधितांमध्ये वाढ
विदर्भात कोरोनाचा सर्वाधिक मृत्युदर अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये आहे. तो कमी करण्याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण विभागाने नागपूरच्या मेडिकलवर सोपवली आहे. त्यानुसार मेडिकलच्या बधिरीकरण विभागप्रमुख डॉ. नरेश तिरपुडे, औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. राजेश गोसावी, अस्थिरोग विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. मोहम्मद फैजल, डॉ. माधुरी होले, डॉ. अतुल राजकोंडावार या तज्ज्ञांनी दोन्ही जिल्ह्यांतील रुग्णालयांचे निरीक्षण केले. तेथील बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांशी चर्चा केली. उपचाराचे निर्देश देण्यात आले.

उपचार यंत्रणा सक्षम हवी
नागपुरातील तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या पथकाच्या निरीक्षणानंतर दोन्ही जिल्ह्यांतील रुग्णालयांत उपचाराची यंत्रणा सक्षम होणे अपेक्षित होते. परंतु, उलट चित्र अनुभवायला येत आहे. दोन्ही जिल्ह्यांतून हल्ली नागपूरच्या मेडिकल, मेयोत अत्यवस्थ बाधितांना हलवण्याचे प्रमाण वाढले आहे. हा प्रकार बघता इतरही सर्दी, खोकल्यासह न्यूमोनिया तसेच सारीचे रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये येत आहेत. अर्नेजा रुग्णालयासह इतरही काही ठिकाणी काही जण कोरोनाबाधित असल्याचे तपासणीत पुढे आले. त्यानंतर तातडीने हे रुग्ण मेडिकल, मेयोत हलवून या खासगी रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांसह इतरही काहींना विलगीकरणात जावे लागले.

हेही वाचा : नागपूर आता क्राईम कॅपिटल राहिले नाही, गुन्ह्यांचे प्रमाण एवढ्या टक्क्यांनी घटले

काही तज्ज्ञांनी नागपूरच्या कोरोनावर उपचार करणाऱ्या काही तज्ज्ञांना दोन्ही जिल्ह्यातील रुग्णालयांत निवडक वेळेसाठी प्रतिनियुक्तीवर पाठवून तेथे मृत्युदर कमी करण्याचा प्रयत्न फायद्याचा ठरणे शक्‍य होते. तसे न करता तेथून बदली टाळण्यासाठी हे रुग्ण नागपूरला हलवले जात आहेत काय? हा प्रश्न आहे. दुसरीकडे अकोला, अमरावतीतील रुग्ण वैद्यकीय शिक्षण खात्याच्या सूचनेवरूनच हलवले जात असल्याचा दावा करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patients goes on increasing after unlock