आधीच कोरोना त्यात जलसंकट प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक हैराण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जून 2020

सतरंजीपुरा झोनमधील भागात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हे संकट तीव्र आहे. अधिकाऱ्यांना फोन करूनही ते दखल घेत नाहीत, अशी तक्रार करीत नगरसेविका आभा पांडे यांनी झलके यांना निवेदन दिले.

नागपूरः सतरंजीपुरा झोनमधील बहुतांशी भाग प्रतिबंधित असून या भागातील नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तूंसह आता पाणी समस्येचाही सामना करावा लागत आहे. पुढील पाच दिवसांत पाणी समस्या न सोडविल्यास आंदोलनाचा इशारा या भागातील नगरसेविका आभा पांडे यांनी दिला. यावर स्थायी समिती व जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी तत्काळ समस्या सोडविण्याचे निर्देश दिले.

सतरंजीपुरा झोनमधील बहुतांशी भाग प्रतिबंधित आहे. त्यामुळे जीवनावश्‍यक वस्तूंसाठी संघर्ष करीत असलेले येथील नागरिक आता जलसंकटाने त्रासले आहेत. लकडगंज झोनमध्येही पाणीटंचाई असून बहुतांशी भागात टॅंकरने पाणी पुरवठा केला जातो. अपुऱ्या टॅंकरमुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. सतरंजीपुरा झोनमधील भागात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हे संकट तीव्र आहे. अधिकाऱ्यांना फोन करूनही ते दखल घेत नाहीत, अशी तक्रार करीत नगरसेविका आभा पांडे यांनी झलके यांना निवेदन दिले.

वाचा- भरधाव वाळूच्या ट्रॅक्‍टरने घेतला व्यक्तीचा बळी...मग संतप्त जमावाने केला चक्काजाम

झलके यांनी तातडीने बैठक बोलावली. त्यांनी गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज या तीनही झोनचा आढावा घेतला. यावेळी झालेल्या झोननिहाय बैठकीत उपमहापौर मनीषा कोठे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते दुनेश्वर पेठे, परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, जलप्रदाय समिती उपसभापती भगवान मेंढे, गांधीबाग झोन सभापती वंदना येंगटवार, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरूची राजगिरे, नगरसेविका यशश्री नंदनवार, नगरसेवक सर्वश्री प्रदीप पोहाणे, दिपराज पार्डीकर, पुरुषोत्तम हजारे, नितीन साठवणे, रमेश पुणेकर, संजय चावरे, शेषराव गोतमारे, नगरसेविका चेतना टांक, वैशाली रोहनकर, जयश्री रारोकर, जलप्रदायच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, तिनही झोनचे सहायक आयुक्त, ओसीडब्ल्यूचे अधिकारी उपस्थित होते. झलके यांनी लकडगंज झोनमध्ये तातडीने टॅंकरची संख्या वाढविण्याचे निर्देश दिले. सतरंजीपुरा झोनमध्येही पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With Corona people facing water shortage