नागपुरात कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची घट, ८ दिवसांत सर्वात कमी मृत्यूची नोंद

केवल जीवनतारे
Wednesday, 9 December 2020

कोरोनाची दुसऱ्या लाटेची भीती नागरिकांपेक्षा प्रशासनाने अधिक घेतली आहे. रुग्णांचा आलेख चढत असल्याचे चित्र पहिल्या आठवड्यात होते. मात्र, दुसऱ्या आठवड्यात मृत्यू संख्या ६ वर आली.

नागपूर : जिह्यात कोरोनाचा कहर कमी झाला आहे. मागील आठ दिवसानंतर पहिल्यांदाच चारशेपेक्षा कमी कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर मृत्यूमध्येही काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. यामुळेच कोरोनाचे भय नागरिकांच्या मनातून दूर होत आहे. मंगळवारी नव्याने ३९४ बाधित आढळले, तर ६ जणांचा मृत्यू झाला आहे. आठवड्यात सर्वात कमी मृत्यूंची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख १५ हजार ३२५ वर पोहोचली, तर ३ हजार ७५४ जण आतापर्यंत कोरोनाच्या बाधेने दगावले आहेत. 

हेही वाचा - २४ वर्षांपूर्वी रेल्वेस्थानकावर सापडलेल्या 'वर्षा'चं गृहमंत्री अनिल देशमुख...

कोरोनाची दुसऱ्या लाटेची भीती नागरिकांपेक्षा प्रशासनाने अधिक घेतली आहे. रुग्णांचा आलेख चढत असल्याचे चित्र पहिल्या आठवड्यात होते. मात्र, दुसऱ्या आठवड्यात मृत्यू संख्या ६ वर आली. शहरातील एकाचा, तर ग्रामीण भागातील तिघांचा कोरोनाच्या बाधेने मृत्यू झाल्याचे पुढे आले. जिल्हाबाहेरच्या दोन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. असे एकूण ६ मृत्यू जिल्ह्यात नोंदवले. आतापर्यंत झालेल्या ३ हजार ७५४ कोरोनाच्या मृतकांमध्ये शहरातील २ हजार ५७४ तर ग्रामीण भागातील ६४८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर जिल्ह्याबाहेरच्या ७१४ जणांना नागपुरात कोरोनावरील उपचारासाठी रेफर करण्यात आले. मात्र, यातील ५३२ जणांना जीव गमवावा लागला. जिल्ह्यात आज आढळून आलेल्या ३९४ कोरोनाबाधितांपैकी ३२६ जण शहरातील आहेत. उर्वरित ६३ जण ग्रामीण भागातील आहेत. मंगळवारी ५ हजार ३४७ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यामुळे चाचण्यांची आतापर्यंतची संख्या ८ लाख २३ हजार ७८४ वर पोहोचली आहे. विशेष असे की, ४ लाख ८० हजार २४३ आरटी पीसीआर, तर ३ लाख ४३ हजार ५४१ रॅपिड अ‌ॅन्टिजेन चाचण्या झाल्या आहेत. घसरत असलेला आलेख बघता सध्या १ हजार ५८ जणांवर मेयो, मेडिकलसह विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा - पर्यटन विकासासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना राबवा; पालकमंत्र्यांकडून पर्यटन विकासाचा आढावा

विलगीकरणातील रुग्ण वाढताहेत - 
मागील आठ दिवसांमध्ये साडेचार हजारावर कोरोनाबाधित आढळून आले. यात प्रामुख्याने लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. यामुळे रुग्णालयात दाखल होत उपचार घेण्यापेक्षा विलगीकरणात राहण्याचा पर्याय कोरोनाबाधित निवडत आहेत. मंगळवारी ३९४ बाधतांचा आकडा वाढल्याने विलगीकरणातील रुग्णांची संख्या ४ हजार २०१ वर पोहोचली आहे. आठ दिवसांपूर्वी ही संख्या २ हजार ९००च्या घरात होती, तर रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या एक हजाराखाली आली होती. मात्र, हा आकडाही फुगला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona positive patents decreases in nagpur

Tags
टॉपिकस
Topic Tags: