रेल्वेतून प्रवास करणाऱ्या युवकाला डॉक्‍टरांनी फोनवर सांगितले, तुझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे आणि मग... 

मंगेश गोमासे
रविवार, 12 जुलै 2020

मूळचा दिल्लीचा रहिवासी असलेल्या 29 वर्षीय युवक एका मीटिंगकरिता नवी दिल्ली-सिकंदराबाद राजधानी एक्‍स्प्रेसने बी-बोगीतून दिल्ली ते बल्लारशाह असा प्रवास करीत होता. प्रवासापूर्वीच त्याने दिल्ली येथे कोरोना तपासणी करून घेतली होती.

नागपूर : दिल्ली येथील 29 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह युवकाने नवी दिल्ली-सिकंदराबाद (02692) राजधानी एक्‍स्प्रेसमधून प्रवास केल्याची धक्कादायक माहिती रविवारी साडेदहा वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वेस्थानकावर समोर आली आहे. यामुळे रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली. त्यामुळे उपस्टेशन व्यवस्थापकांनी धावपळ करीत रेल्वे रुग्णालयातील डॉक्‍टर, आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांना माहिती देत त्या युवकाला मेयो रुग्णालयात दाखल केले. 

मूळचा दिल्लीचा रहिवासी असलेल्या 29 वर्षीय युवक एका मीटिंगकरिता नवी दिल्ली-सिकंदराबाद राजधानी एक्‍स्प्रेसने बी-बोगीतून दिल्ली ते बल्लारशाह असा प्रवास करीत होता. प्रवासापूर्वीच त्याने दिल्ली येथे कोरोना तपासणी करून घेतली होती. प्रवासादरम्यान त्यांना डॉक्‍टरांचा फोन आला. अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

आज सकाळी 10.30 वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी थांबली असता कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या प्रवाशाने नागपूर महानगरपालिकेतील नियंत्रण कक्षाला फोन करून कोरोनो पॉझिटिव्ह अहवाल आल्याचे सांगितले. मनपा कर्मचाऱ्यांनी उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयाशी संपर्क साधला. उपस्टेशन व्यवस्थापक अतुल श्रीवास्तव यांना त्या प्रवाशासंदर्भात माहिती दिली.

प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता श्रीवास्तव यांनी लगेच रेल्वे डॉक्‍टर, रेल्वे प्रशासन, आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांना सूचना देत, मनपाला रुग्णवाहिकेसह पथकाची मागणी केली. मात्र, मनपाची रुग्णवाहिका उशिरा येणार असल्याचे कळताच डॉक्‍टर स्टेशनवर पोहोचले. त्या प्रवाशाला रुग्णवाहिकेने मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले. 

अधिक वाचा - अबब! बेंबळा धरणात २० किलोची एकच मासोळी...मासेमारी जोमात
 

संघमित्रा एक्‍स्प्रेसमध्येही खळबळ 

02295 बंगरुळू-दाणापूर संघमित्रा एक्‍स्प्रेसच्या बी-3 बोगीत संशयित आढळलेल्या दोघांना मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. ही घटना रविवारी सकाळी नागपूर रेल्वेस्थानकावर घडली. बेगुसराय, बिहार निवासी 19 वर्षांचा युवक आणि त्याच्या सोबत 32 वर्षांचा व्यक्ती दोघेही संघमित्रा एक्‍स्प्रेसच्या बी-3 बोगीने प्रवास करीत असताना युवकाची प्रकृती बिघडली. कोरोनोसारखे लक्षण त्याच्यात होते. सकाळी 7.58 वाजताच्या सुमारास नागपूर स्थानकावर गाडी येताच दोघांनाही उतरविण्यात आले. रेल्वे डॉक्‍टरांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी दोघांनाही मेयो रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Positive Young man travels on the Capital Express