कोल्हापुरात 16 हजार चाचण्या, उपराजधानीत केवळ 10 हजारावर, काय असावे कारण?

केवल जीवनतारे
गुरुवार, 28 मे 2020

विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर येथील प्रयोगशाळा सुरू करण्याचे संकेत असताना चंद्रपूर येथील आरटी-पीसीआर यंत्र "जळगाव' येथे वापर करण्यासाठी थांबले. यामुळे चंद्रपूर येथील प्रयोगशाळा अद्याप सुरू होऊ शकली नाही.

नागपूर : कोविड-19 विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्रात कोविड-19 तपासणी प्रयोगशाळांची संख्या वाढणे आवश्‍यक आहे. निदान चाचण्यांची गती वाढण्याची गरज आहे. कोल्हापूरसारख्या शहरात एकच प्रयोगशाळा असताना 16 हजारांवर कोरोनाच्या निदान चाचण्या करण्यात आल्या. त्या तुलनेत नागपुरात पाच प्रयोगशाळा असूनही अवघ्या 10 हजार 829 चाचण्या होऊ शकल्या. यावरून शहरातील प्रयोगशाळांमध्ये निदान चाचण्यांची गती मंद असल्याचे पुढे आले.

विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर येथील प्रयोगशाळा सुरू करण्याचे संकेत असताना चंद्रपूर येथील आरटी-पीसीआर यंत्र "जळगाव' येथे वापर करण्यासाठी थांबले. यामुळे चंद्रपूर येथील प्रयोगशाळा अद्याप सुरू होऊ शकली नाही. राज्यात वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाअंतर्गत येणारी सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये, सर्व खासगी वैद्यकीय महाविद्यालये त्याचप्रमाणे अभिमत विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये "कोविड-19 तपासणी प्रयोगशाळा' सुरू करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी एप्रिल महिन्यात दिले होते.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी... भूगोल विषयाबाबत बोर्डाने घेतला हा निर्णय

वैद्यकीय शिक्षण संचालनालयाअंतर्गत येणाऱ्या व अद्यापपर्यंत कोविड-19 प्रयोगशाळा नसणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये "कोविड-19 तपासणी प्रयोगशाळा' सुरू करण्यात याव्यात त्याचप्रमाणे सर्व खासगी आणि अभिमत विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये अशा तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याबाबत चाचपणी करण्यात याव्यात अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी यांना दिल्या होत्या, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी याबाबतचे प्रस्ताव इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च नवी दिल्ली यांच्याकडे पाठवले.

वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी पत्राद्वारे सर्व महाविद्यालयांना माहिती दिली आहे. सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा सुरू करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शविला आहे. चंद्रपूर आणि गोंदियासह गडचिरोली येथेही प्रयोगशाळेची गरज आहे. यामुळेच प्रयोगशाळांच्या प्रस्तावना केंद्र शासनाकडून तातडीने मान्यता मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. चंद्रपूर येथील पीसीआर यंत्र जळगाव येथील कोरोनाची स्थिती बघता येथील वैद्यकीय महाविद्यालयात या यंत्राचा वापर करून प्रयोगशाळा उभारली, यासंदर्भात वैद्यकीय संचालक डॉ. लहाने यांच्याशी संपर्क साधला, ते बैठकीत असल्याने संपर्क होऊ शकला नाही.

 

प्रत्येक जिल्हा रुग्णालयात हवी प्रयोगशाळा

प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नाहीत. यामुळे शंभर किलोमीटरचे अंतर कापून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपचारासाठी गाठावे लागते. लॉकडाउनमुळे प्रवास शक्‍य नाही. यामुळे प्रत्येक जिल्ह्य रुग्णालयात कोविड-19 तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात यावी, असा सूर आहे. नागपुरात एम्स, मेडिकल, मेयो, माफसु आणि नीरी येथे पाच प्रयोगशाळा आहेत. मेडिकलमध्ये एका दिवसाला किमान 700 चाचण्यांची क्षमता आहे, परंतु दोनशेही होत नसल्याचे उघड झाले. यासंदर्भात प्रयोगशाळा प्रमुख तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona testing in Nagpur is very slow compar to others