कोरोनापाठोपाठ विदर्भात "या' आजारानेही काढले डोके वर; मेडिकलमध्ये एकाचा बळी 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

कोरोनासोबतच "सारी' या आजाराचे सावट विदर्भावर आहे. मागील महिनाभरात तीनशेपेक्षा अधिक "सारी'चे रुग्ण विदर्भात आढळून आले आहेत.

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) साडेसहा वाजताच्या सुमारास एका 52 वर्षीय पुरुषाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याला मधुमेह, रक्ताचा कर्करोग आणि श्‍वसनाचा त्रास होता. विशेष असे की, त्याला न्युमोनिया झाल्याचे निदान झाले. उपचारादरम्यान बारा वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्याला अनेक व्याधींसह "सारी' (सिव्हिअर ऍक्‍युट रेस्पिरेटरी इन्फेक्‍शन्स) नावाचा आजार असल्याचे निदान झाले. 

कोरोनासोबतच "सारी' या आजाराचे सावट विदर्भावर आहे. मागील महिनाभरात तीनशेपेक्षा अधिक "सारी'चे रुग्ण विदर्भात आढळून आले आहेत. एकीकडे नागपूरसर विदर्भात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे, तर दुसरीकडे "सारी' या आजाराच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. महिनाभरात विदर्भात "सारी'चे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळल्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर नोंदीचे दुहेरी संकट आले आहे. 

अवश्य वाचा- या जिल्ह्यातून आली गुड न्यूज, 69 जणांना मिळाला दिलासा...

विदर्भातील "सारी'चे 300 रुग्ण

मुंबई आणि पुण्यानंतर नागपुरातही कोरोनाचे रुग्ण वाढले. त्यामुळे आरोग्य विभागाचीही चिंता वाढली. आता "सारी' या आजाराने विदर्भाला विळख्यात घेतले आहे. मार्चमध्ये विदर्भातील अकरा जिल्ह्यांत "सारी'चे जवळपास 300 रुग्ण आढळले. पैकी सर्वाधिक रुग्णांची नोंद नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे करण्यात आली आहे. संचारबंदीचा काळ बघता मेडिकल, मेयोत दाखल "सारी'च्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे नागपूरसह विदर्भातील असल्याची सूत्रांची माहिती आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयातील नोंदीनुसार गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक तर त्या खालोखाल चंद्रपूर जिल्ह्यात "सारी'च्या रुग्णांची नोंद झाली आहे. पश्‍चिम विदर्भात "सारी'चे तब्बल 13 रुग्ण आढळले आहेत. 

अशी आहेत लक्षणे 

"सारी' आणि कोरोना या दोन्ही आजारांची लक्षणे जवळपास सारखीच आहेत. "सारी'च्या रुग्णाला एकदम सर्दी, ताप येतो. तापाचे प्रमाण जास्त असते. शिवाय अशक्तपणा खूप येतो. न्युमोनिया, श्वसन दाह, छातीत दुखणे, रक्त शुद्धीकरण क्षमता कमी होणे इत्यादी लक्षणेही आहेत. रुग्णालयात बऱ्याच रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज पडते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Like corona there is one more Disease in Vidarbha again