वाघाला तर नाही ना कोरोना? भितीने वन्यप्राण्यांवरही सीसीटीव्हीची नजर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

सर्व प्राणिसंग्रहालयांना "हाय अलर्ट' देण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे प्राण्यांवर आणि त्यांच्या वर्तनावर 24 तास लक्ष ठेवले जावे. प्राण्यांची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षेची सर्व खबरदारी घेतल्याशिवाय त्यांना कामाची परवानगी देऊ नये. प्राण्यांना खाऊ घालताना कर्मचाऱ्यांचा त्यांच्याशी कमीतकमी संपर्क येईल अशी काळजी घ्यावी. आजारी प्राण्यांचे तातडीने विलगीकरण केले जावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

नागपूर : अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील ब्रॉंन्क्‍स झूमधील वाघाला  कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लगेच केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने देशातील सर्वच प्राणीसंग्रहालयाला सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. वाघांसहीत सर्व मांसाहारी प्राण्यांकडे 24 बाय सात काटेकोर लक्ष देण्याचे आदेश सर्व प्राणिसंग्रहालयांना देण्यात आले आहेत. त्यानुसार येथील गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रातील वन्यप्राण्यांवर सीसीटीव्हीने नजर ठेवली जात आहे.

न्यूयॉर्कच्या प्राणिसंग्रहालयातील वाघामध्ये  कोरोनाचे विषाणू आढळल्याचे अमेरिकेने जाहीर करण्यात आले. त्यानंतर, सोमवारी भारतातील सर्व प्राणिसंग्रहालयांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व प्राणिसंग्रहालयांना "हाय अलर्ट' देण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे प्राण्यांवर आणि त्यांच्या वर्तनावर 24 तास लक्ष ठेवले जावे. प्राण्यांची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षेची सर्व खबरदारी घेतल्याशिवाय त्यांना कामाची परवानगी देऊ नये. प्राण्यांना खाऊ घालताना कर्मचाऱ्यांचा त्यांच्याशी कमीतकमी संपर्क येईल अशी काळजी घ्यावी. आजारी प्राण्यांचे तातडीने विलगीकरण केले जावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
वाघ व इतर प्राण्यांची तसेच सस्तन प्राण्यांची विशेष काळजी घ्यावी. संशयास्पद प्राण्यांचे नमुने प्राणी आरोग्य संस्थेकडे दर पंधरा दिवसांनी पाठवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेतत. भोपाळ, हिसार आणि बरेली येथील संस्थांकडे या कामाची जबाबदारी दिली असल्याचेही प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने म्हटले आहे. प्राणिसंग्रहालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक स्वच्छतेची संपूर्ण काळजी घ्यावी. प्राणिसंग्रहालयांनी सातत्याने शासनाच्या त्या त्या ठिकाणच्या नोडल संस्थेच्या नियमित संपर्कात राहावे, असेही प्राधिकरणाने दिलेल्या सूचनांमध्ये म्हटले आहे.

कर्मचाऱ्यांची संख्या केली कमी
गोरेवाडा येथे वाघासह विविध प्रजातींचे वन्यप्राणी आहेत. या प्राण्यांचा व काम करणाऱ्या कामगारांचा संपर्क कमी केला जात आहे. कर्मचाऱ्यांची संख्या निम्म्यावर आणण्यात आली आहे. जे कर्मचारी आहेत त्यांना परिसराबाहेर जाण्यास मज्जाव केला आहे. त्यांच्या वैयक्तिक स्वच्छेतकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करुनच रेस्क्‍यू सेंटरमध्ये प्रवेश दिला जात आहे. त्या कर्मचाऱ्यांना सलग सात दिवस परिसरात राहण्याची सक्ती असून त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनेटायझरचा वापर करण्याची सक्ती करण्यात आली आहे. वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी सीसीटीव्हीची नजर आहे. गोरेवाड्यातील कोणत्याही प्राण्याला सध्या आजाराची लक्षणे दिसून आलेली नाहीत. प्रत्येक प्रजातीमध्ये विषाणु प्रतिकाराची क्षमता वेगळी असते. जंगलात रेस्क्‍यू केलेल्या प्राण्यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गोरेवाड्यात आणण्यात येऊ नये अशा सुचना वन विभागाला देण्यात आल्या आहेत. यापुर्वीही बाहेरून आणलेल्या प्राण्याला 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत होते. याशिवाय इतरही उपाययोजना करण्यात येत आहेत, असे पशुवैद्यकीय डॉ. शिरीष उपाध्ये यांनी सांगितले.

सविस्तर वाचा - कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण म्हणतो मला बळजबरीने पकडून ठेवले आहे, सोशल मीडियावर केला व्हिडिओ व्हायरल

महाराजबागेत प्राण्यांना व्हिटॅमिन्स

कोरोनाची लागण प्राण्यांना होऊ नये म्हणून महाराजबाग प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. कर्मचारी कोणत्याही परिस्थितीत प्राण्यांच्या संपर्कात येणार नाहीत याची दक्षता घेतली जात आहे. कर्मचारी पूर्ण वेळ महाराजबागेतच असून त्यांना बाहेर जाण्यास मनाई आहे. त्यांना ग्लोव्हज आणि मास्क देण्यात आले आहेत. प्राण्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून त्यांना खाण्यातून व्हिटॅमिन्स देण्यात येत आहेत. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या सुचनेनुसार 18 मार्चपासून प्राणीसंग्रहालय बंद करण्यात आलेले आहे, असे महाराजबाग प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर यांनी दिली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona"s misgiving to animals also