'भ्रष्टाचार हा तर सिस्टमचा भाग'; राज्याच्या पोलिस महासंचालकांचं धक्कादायक वक्तव्य 

Corruption is part of a system said DG of Maharashtra
Corruption is part of a system said DG of Maharashtra

नागपूर ः भ्रष्टाचार हा सिस्टीमचा भाग आहे. पोलिस आणि महसूल विभागांतील कर्मचाऱ्यांची संख्या अन्य विभागांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे भ्रष्ट कर्मचाऱ्यांचा आकडा अन्य विभागांच्या तुलनेत कमीच आहे. आपण या प्रकाराचे समर्थन करीत नाही. भ्रष्टाचार करणारा अधिकारी किंवा कर्मचारी कुण्या वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारून करीत नसतो, असे अजब-गजब वक्तव्य राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांनी केले.

डीजी नगराळे आज नागपुरातील पोलिस जिमखान्यात आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांत उपराजधानीतील गुन्हेगारीत वाढ झाली होती. त्यामुळे गेल्या भेटीत पोलिस आयुक्तांना विशेष सूचना दिल्या होत्या. त्यामुळे सध्या गुन्हेगारी नियंत्रणात आहे. राज्यातील गुन्हेगारीचा आढावा घेण्यात आला असून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे. त्याचे परिणाम काही दिवसांतच दिसू लागतील. 

कोरोनामुळे राज्य पोलिस दलातील ३३९ पोलिस मृत पावले आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पोलिस विभागात सामावून घेत नोकरी देण्यात येणार आहे. नागपूर पोलिस दलात ३० जणांच्या अनुकंपाच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला. कोरोना काळात रस्त्यावर पोलिस दिसावेत, जेणेकरून कामावर परिणाम होऊ नये. तसेच कोरोनापासून बचावसुद्धा व्हावा, यासाठी उपाययोजना करीत आहोत.

येत्या दोन महिन्यांत पोलिस भरती

राज्यात २० हजार पदे रिक्त आहेत. गृहमंत्र्यांनी १२ हजार ५०० पोलिस कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याचे सांगितले होते. पोलिस भरती दोन टप्प्यांत होणार आहे. तांत्रिक अडचणीमुळे पोलिस भरतीला विलंब होत आहे. मात्र आता त्या अडचणी सोडविण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत पोलिस भरतीला सुरुवात होईल. युवकांनी तयारीला लागावे, असेही डीजी नगराळे म्हणाले.

डीजी कार्यालयात अ आणि ब वर्गातील अधिकारी वगळता अन्य कर्मचाऱ्यांना ५० टक्के उपस्थितीबाबत निर्णय घेण्यात आला. तो निर्णय केवळ डीजी कार्यालयासाठी आहे. राज्यातील पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षकांनी आपापल्या स्टाफबाबत निर्णय घ्यावा, असे डीजी म्हणाले. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com