....तर होईल विद्यार्थी, महाविद्यालयांची आर्थिक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जून 2020

अनुसूचित जाती आणि जमातीच्या काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला असला, तरी इतर मागासवर्गीय, व्हीजेएनटी, एसबीसीच्या विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात दमडीही जमा झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांचीही आर्थिक कोंडी झाली आहे.

नागपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र व राज्यासमोर मोठे आर्थिक संकट आले आहे. या संकटामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीवर गंडांतर येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गेल्या वर्षीची शिष्यवृत्ती अद्याप मिळालेली नसून, येणारी शिष्यवृत्तीही संपणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांवरही आर्थिक संकट कोसळण्याची चिन्हे आहेत. 

राज्याच्या समाजकल्याण विभागामार्फत दरवर्षी महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कापोटी शिष्यवृत्ती मिळत असते. साधारणत: अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना पूर्ण तर इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पन्नास टक्के शुल्काचा परतावा मिळतो. गेल्या वर्षीपासून राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, तंत्रनिकेतन, हॉटेल व्यवस्थापन या तांत्रिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा, यासाठी "डीबीटी' (डायरेक्‍ट फंड ट्रान्सफर) योजना लागू करण्यात आली.

मात्र, दरवर्षी तांत्रिक कारण देत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवले जात आहे. 2019-20 या वर्षातील शिष्यवृत्तीचे अद्याप वाटप झालेले नाही. यात अनुसूचित जाती आणि जमातीच्या काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला असला, तरी इतर मागासवर्गीय, व्हीजेएनटी, एसबीसीच्या विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात दमडीही जमा झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांचीही आर्थिक कोंडी झाली आहे. शिष्यवृत्ती हेच व्यावसायिक महाविद्यालयांच्या उत्पन्नाचे एकमेव स्रोत असते. मात्र, शिष्यवृत्ती अडकल्याने महाविद्यालयांसमोर संकट उभे राहिले आहे. परिणामी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन देण्यास महाविद्यालये असमर्थ ठरत आहेत. कोरोनामुळे आता संपूर्ण प्रक्रियाच बंद आहे. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश असलेल्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना याचा अधिक फटका बसण्याची शक्‍यता आहे. 

हेही वाचा : बेसा पॉवर हाऊस परिसरात फिरत होता रमजान, पोलिसांना समजताच... 

टाळेबंदीमुळे अर्जही अडकले 
शिष्यवृत्तीसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांची अर्ज प्रक्रिया ही महाविद्यालयांकडून पूर्ण करण्यात आली आहे. मात्र, कोरोनामुळे हजारो विद्यार्थ्यांचे अर्ज हे समाजकल्याण व संबंधित विभागांमध्ये अडकून पडले आहेत. या अर्जांची छाननीसह प्रक्रियाही थांबली आहे. त्यामुळे यावर्षीच्या विद्यार्थ्यांची अर्ज प्रक्रियाच पूर्ण न झाल्याने शिष्यवृत्ती कधी मिळेल ही आशा धूसर आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crisis on students scholarships?