खाण्यासाठी मरमर, खवय्यांना ना चिंता, ना भिती !

राजेश प्रायकर
Tuesday, 29 September 2020

कोरोनामुळे ‘मिशन बिगिन अगेन'अंतर्गत रेस्टॉरंटला ग्राहकांना केवळ पार्सल देण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, काही मालकांनी हॉटेल समोरच चारचाकी वाहने लावण्याची परवानगी दिली आहे. हॉटेलमधून खाद्य पदार्थ खरेदी केल्यानंतर वाहनाच्या आजूबाजूने उभे राहून खवय्ये ताव मारताना दिसून येत आहे.

नागपूर : शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या तिपटीने वाढली असली नागपूरकरांत मात्र कुठलीही भीती नसल्याचे चित्र आहे. सायंकाळ होताच अनेक खवय्ये विविध रेस्टॉरंटसमोर सामाजिक अंतर न पाळता गर्दी करीत आहे. त्यामुळे पार्सलच्या नावावर उघडण्यात आलेली रेस्टॉरंट कोरोना संक्रमणाचे मोठे अड्डे ठरण्याची शक्यता वाढली आहे. 

कोरोनामुळे ‘मिशन बिगिन अगेन'अंतर्गत रेस्टॉरंटला ग्राहकांना केवळ पार्सल देण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, काही मालकांनी हॉटेल समोरच चारचाकी वाहने लावण्याची परवानगी दिली आहे. हॉटेलमधून खाद्य पदार्थ खरेदी केल्यानंतर वाहनाच्या आजूबाजूने उभे राहून खवय्ये ताव मारताना दिसून येत आहे.

सेंट्रल बाजार रोडवरील दररोज रात्री खवय्यांची जत्रा दिसून येत आहे. ऑर्डर घेतल्यानंतर ते पदार्थ तयार होईपर्यंत नागरिक येथेच थांबतात. अनेक जण येथेच ताव मारतात. त्यामुळे मोठी गर्दी होत असून सामाजिक अंतराचा लवलेशही दिसून येत नाही. एवढेच नव्हे तर अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही दिसून येत नाही.

महापालिकेचे आयुष हॉस्पिटल बंगल्यात

एकीकडे महापालिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी नागरिकांना मास्क लावणे, घरातून बाहेर न पडणे, गर्दी न करण्याचे आवाहन करीत आहेत. परंतु, प्रशासनाचे आवाहन कुणी गांभीर्याने घेत नसल्याचेच चित्र आहे. जनजागृतीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असला तरी खवय्यांच्या बेफिकिरीने सर्व खर्च व्यर्थ जात असल्याचे यानिमित्त अधोरेखित झाले.

रस्त्यांवर ‘ट्राफिक जाम'
रामदासपेठेतील एका रेस्टॉरंटपुढे सायंकाळी वाहनांची मोठी गर्दी होत असल्याने सेंट्रल बाजार रोडवर अनेकदा वाहतूक कोंडी होते. अनेकदा महापालिकेचे अधिकारी, वाहतूक पोलिस याच रस्त्याने जाताना दिसतात. परंतु, कारवाईसाठी महापालिका किंवा वाहतूक पोलिसही पुढे येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. येथे हॉस्पिटल्स असल्याने ॲम्बुलन्सचीही रहदारी असते. वाहतूक कोंडीमुळे उपचारासाठी वेळेत न पोहोचल्याने रुग्णाला काही झाले तर जबाबदार कोण? असा प्रश्नही यानिमित्त विचारला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowds in front of restaurants for food, not afraid of corona either