सायबर फिशिंग : जामताऱ्याच्या हिटलिस्टवर "महाराष्ट्र'

अनिल कांबळे
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

झारखंड राज्यातील जामतारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये देशभरातील सामान्य नागरिकांना गंडविण्याचे काम अविरत सुरू असते. दुधनिया आणि कालाझरीया या दोन्ही गावांची ओळख "सायबर गुन्हेगार गाव' अशी निर्माण झाली आहे.

नागपूर : "मी बॅंकेचा अधिकारी बोलतो आहे. तुमचे एटीएम, क्रेडिट कार्ड बंद पडले आहे. पूर्वरत सुरू करण्यासाठी एटीएम नंबरची खात्री करून घ्या', असा कॉल आल्यास आता त्याला थेट "आप जामतारा से बात कर रहे हो क्‍या?' एवढा प्रश्‍न विचारा. ती व्यक्‍ती लगेच फोन कट करेल. तो मोबाईल क्रमांकसुद्धा बंद दिसेल. होय, झारखंड राज्यातील "जामतारा' हे शहर देशातील "सायबर फिशिंग'चे केंद्र बनले आहे. जामतारा येथील जवळपास 90 टक्‍के घरांमध्ये एक सायबर क्रिमिनल लपून बसला आहे. त्यांना सर्वाधिक "बळी' महाराष्ट्र राज्यातील ग्राहक पडल्याची
माहिती समोर आली आहे.

झारखंड राज्यातील जामतारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये देशभरातील सामान्य नागरिकांना गंडविण्याचे काम अविरत सुरू असते. दुधनिया आणि कालाझरीया या दोन्ही गावांची ओळख "सायबर गुन्हेगार गाव' अशी निर्माण झाली आहे. या गावांमधील 90 टक्‍के लोकांचा व्यवसाय लोकांना इंटरनेट आणि मोबाईलच्या माध्यमातून गंडविण्याचा आहे. या गावांतील मोबाईल टॉवरवरून एक दिवसात हजारो कॉल्स लावले जातात. महाराष्ट्र राज्यातील भोळीभाबडी जनता याला सर्वाधिक बळी पडत आहे. जामतारा गावातील लोक कोट्यधीश आहेत. आलिशान गाड्या, मोठमोठे बंगले, बॅंक बॅलन्स असा या गावातील लोकांचा थाट आहे. जामताऱ्याच्या हिटलिस्टमध्ये महाराष्ट्र आहे. फिशिंगमध्ये सर्वाधिक गंडविणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील जनतेचा क्रमांक लागतो. वर्ष 2019 मध्ये सायबर क्राइमच्या 3 हजार 23 तक्रारी नागपूर सायबर पोलिसांनी नोंदविल्या आहेत. 73 लाख 75 हजारांनी नागपूरकरांची फसवणूक झाली आहे. तर, 2018 मध्ये 1 हजार 800 तक्रारी नोंद झाल्या असून, 32 लाखांपेक्षा जास्त रक्‍कम उकळण्यात आली. 2017 मध्ये 1798 सायबर तक्रारी होत्या. यामध्ये 46 लाखांपेक्षा जास्त रुपयांनी नागपूरकरांना सायबर गुन्हेगारांनी गंडविले आहे.

अनेक भाषांवर प्रभुत्व
जामतारा येथील फक्‍त आठवी ते दहावीपर्यंत शिक्षित असलेल्या युवकांचे इंग्रजी, कन्नड, तेलगू, बांगला, उर्दू, हिंदी, मराठी, पंजाबी, उडीया, तमीळ यांसह अन्य भाषांवर प्रभुत्व आहे. कोणत्याही राज्यातील बॅंक ग्राहकाला फोन लावल्यानंतर त्याच्या मातृभाषेत जामतारातील युवक बोलतात. इंग्रजी भाषा एवढी सहजतेने बोलतात की, कुणाचाही विश्‍वास बसावा. या गावातून सलग 24 तास मोबाईल कॉलिंग सुरू असते.

असे झाले जामतारा हिट
2019मध्ये जामतारामधून शंभरपेक्षा जास्त तरुणांना पोलिसांनी फिशिंगच्या गुन्ह्यात अटक केली. त्यांच्याकडून 224 मोबाईल फोन जप्त केले. 354 सिम कार्ड, 163 एटीएम कार्ड, विविध बॅंकांचे 83 पासबुक, 23 चेकबुक, 30 दुचाकी आणि 12 कार जप्त करण्यात आल्या. कमाईचे कोणतेही साधन नसताना गावकरी एवढे श्रीमंत कसे, असा प्रश्‍न पोलिसांना पडला होता. अनेक गावकऱ्यांची बॅंक खाती तपासली असता मोठे घबाड बाहेर निघाले.

यांचीही भूमिका संशयास्पद
सायबर फिशिंग करणाऱ्या युवकांचे बॅंक अधिकारी आणि मोबाईल नेटवर्क पुरविणाऱ्या कंपन्यांशी साटेलोटे असण्याची शक्‍यता आहे. कारण, सिम कार्ड विकत घेण्यासाठी गेले असता कागदपत्रे, फिंगरप्रिंट, फोटो आणि आयकार्ड बघितले जाते. मात्र, जामतारा येथील एका युवकाकडे हजारपेक्षा जास्त सिम कार्ड आहेत. तसेच ज्या बॅंकेतील खात्यात पैसे वळते केले जातात, ते खातेसुद्धा बनावट कागदपत्रांवर काढण्यात आलेले असते.

लालच बुरी बला...
मोठमोठ्या शॉपिंग मॉलमध्ये, बिग बाजारात, सुपर मार्केट्‌स किंवा महागड्या वस्तूंच्या खरेदीनंतर "लकी ड्रॉ'साठी कुपन ठेवलेले असते. काहीतरी बक्षीस मिळेल, या लालसेपाटी अनेक जण स्वतःचा मोबाईल क्रमांक लिहून चिठ्ठी एका डब्यात टाकतात. तेथूनच आपला मोबाईल क्रमांक मोठमोठ्या कंपन्या, फिशिंग करणाऱ्या आरोपींना दिले जातात. ऑनलाइन खरेदी करतानासुद्धा ग्राहकांचे मोबाईल क्रमांक मिळविले जातात.
पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवा
आपले आधार कार्ड किंवा अन्य कागदपत्रे सार्वजनिक करू नका. झेरॉक्‍स काढतानाही काळजी घ्या. डाटाबेस तयार करण्यासाठी मॉल, शॉपिंग सेंटर्स आणि काही दुकानदारही आरोपींना मदत करीत असतात. बॅंकेतून फोन आल्यास लगेच कट करा किंवा बॅंकेत येऊन चौकशी करून घ्या. कुणावरही डोळे बंद करून विश्‍वास करू नका. खात्यातून पैसे लंपास केल्यास लगेच बॅंकेत आणि पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवा.
-डॉ. अर्जुन माने, सायबर एक्‍स्पर्ट, नागपूर
.........
एटीएम कार्ड क्‍लोन करून किंवा ऑनलाइन खात्यातून रक्‍कम लंपास केल्यास थेट पोलिस तक्रार करा. तक्रार केल्यानंतर सायबर क्राइम पोलिस घटनेचा अभ्यास आणि तपास करतात. आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करून लंपास केलेल्या रकमेसह आरोपींना अटक करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. त्यामुळे तक्रार करण्याकडे दुर्लक्ष करू नका.
डॉ. नीलेश भरणे, अपर पोलिस आयुक्‍त, नागपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cyber phishing center in Jamtara