धोकादायक ! रेल्वेत खर्रा, जेवणाची सर्रास विक्री

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

कोरोनाच्या दहशतीमुळे शहरात हॉटेल्स, भोजनालये बंद असताना आऊटरवर मात्र खाद्यपदार्थ सहजतेने उपलब्ध आहेत. हा संपूर्ण प्रकार अनधिकृत आणि अत्यंत धोकादायक आहे.

नागपूर : नागपूरमार्गे धावणाऱ्या श्रमिक व राजधानी एक्‍स्प्रेस आऊटरवर थांबताच लगतच्या झोपडपट्टीतील मुले धोकादायकपद्धतीने खाद्यपदार्थ, पाणी, जेवण, खर्रा अन्‌ गुटख्याची विक्री करतात. अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या या धोकादायक प्रकारामुळे प्रवासी आणि नागरिकांना कोरोनाच्या संसर्गाचा धोका आहे.

नगरसेवक लखन येरावार यांनी या गंभीर बाबीची तक्रार डीआरएम कार्यालयात केली आहे. यानंतरही संबंधित यंत्रणांकडून मात्र डोळेझाक केली जात आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी रेल्वेसेवा थांबविण्यात आली आहे. पार्सल व मालगाड्या धावत आहेत. अडकून पडलेल्या श्रमिकांना स्वगृही सोडण्यासाठी श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. नागरिकांच्या सुविधेसाठी काही राजधानी स्पेशल गाड्याही चालविल्या जात आहेत.

राज्य शासनाच्या शाबासकीनंतरही एकलव्य पुरस्कार विजेत्याच्या नशिबी ई-रिक्षा

गाड्यांची संख्या वाढताच आऊटरवर गाड्या थांबवून ठेवण्याचे प्रकारही वाढले आहेत. प्रवासात वेळीच जेवण पाणी मिळत नसल्याची ओरड आता जुणी झाली आहे. त्यातच तासन्‌तास रेल्वेगाड्या आऊटरवर थांबल्यामुळे प्रवाशांची अधिकच गैरसोय होत आहे. ही संधी "इन कॅश' करून घेण्यासाठी तकीय, धंतोली झोपडपट्टीतील काही युवक सरसावले आहेत. प्रवासी गाड्या थांबताच युवक खाद्यपदार्थ, बाटलीबंद पाणी, चहा, नास्ता, खर्रा, गुटखा विक्रीसाठी घेऊन येतात.

कोरोनाच्या दहशतीमुळे शहरात हॉटेल्स, भोजनालये बंद असताना आऊटरवर मात्र खाद्यपदार्थ सहजतेने उपलब्ध आहेत. हा संपूर्ण प्रकार अनधिकृत आणि अत्यंत धोकादायक आहे. एखाद्या कोरोनाची बाधा असणाऱ्या प्रवाशाच्या संपर्कात विक्रेते आल्यास संपूर्ण झोपडपट्टीतच कोरोनाचा प्रसार होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. या गंभीर प्रकाराकडे नगरसेवक लखन येरावार यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. या प्रकाराबाबत आरपीएफकडे विचारणा केली असता तातडीने विशेष मोहीम राबवून अवैध व्हेंडरचा बंदोबस्त करण्याच्या बाता केल्या जातात. पण, कारवाई होणार तरी कधी हा प्रश्‍न अनुत्तरीतच राहतो. 
एकीकडे वृत्तांकनासाठी रेल्वेस्थानकावर जाणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधींना मज्जाव केला जातो. प्रतिनिधींना थांबविण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने मेन गेटवर बंदोबस्त लावला आहे. परंतु, रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर अवैध व्हेंडरकडून खाद्यपदार्थ आणि गुटख्याची विक्री होते. त्याची मात्र दखल घेतली जात नाही. याप्रकाराने रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dangerous! sale of food, kharra on the train