‘आमच्याकडे गुंडांची टोळी, प्लॉटचा ताबा पाहिजे तर आण ८० लाख’, चक्क मालकालाच दिली धमकी, आता

योगेश बरवड
Thursday, 6 August 2020

लॉकडाउनच्या काळात रिकाम्या भूखंडावर चौघांनी ताबा मिळविला. मानवी दृष्टिकोनातून प्रारंभी बिल्डरने त्याकडे दुर्लक्ष केले. पण, तीच मोठी चूक ठरली.

नागपूर :  दिवसेंदिवस उघडकीस येणाऱ्या नवनव्या घटनांमुळे कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर नाही, हेच कळत नाही. विश्वासाला तडा देणारी अशीच एक घटना नागपुरात उघडकीस आली. बिल्डरच्या भूखंडावर ताबा मिळवून त्यांनाच दमदाटी केल्याचा प्रकार उघडकीस आला.  

लॉकडाउनच्या काळात रिकाम्या भूखंडावर चौघांनी ताबा मिळविला. मानवी दृष्टिकोनातून प्रारंभी बिल्डरने त्याकडे दुर्लक्ष केले. पण, तीच मोठी चूक ठरली. भूखंडावर ताबा मिळविणाऱ्यांनी अनलॉक सुरू होताच बिल्डरला धमकावत ८० लाखांच्या खंडणीची मागणी केली. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी चौघांविरुद्ध खंडणीखोरीचा गुन्हा दाखल केला आहे. साईनाथ मुरलीधर जाधव (३३ रा. न्यू नरसाळा, इंदिरानगर) ममता शकूर शेख (३६ रा. आंबेडकर नगर, धरमपेठ) नलिनी राजेश बढीये (४५ रा. सेवानगर, पांढराबोडी) व मिना किशोर हाडोळे (३५ वर्ष, रा. सेवानगर, पांढराबोडी) अशी आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा - व्वा रे पठ्ठे... मजूर मिळत नसल्याने तण काढण्यासाठी शेतकऱ्याने लढवली ही शक्‍कल...
 

बेकायदेशीरपणे घेतला ताबा

 

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार शंकरनगरच्या गुंडावार कॉम्प्लेक्समध्ये राहणारे मंगेश काशीकर (४७) हे शिवसेना नेते व व्यावसायी आहेत. प्रशांत सातपुते त्यांचे व्यावसायिक भागीदार आहेत. सातपुते यांचा कॅनल रोड गोकुलपेठ येथे भूखंड आहे. या भूखंडावर घराचे बांधकाम करण्याची दोघांचाही योजना आहे. काम सुरू करण्याची तयारी झाली असताना अचानक कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरू झाले. या संधीचा लाभ घेत आरोपींनी १८ फेब्रुवारी रोजी गोकुळपेठेतील प्लॉटचा बेकायदेशीरपणे ताबा घेतला. 

 

तक्रार करण्याची दिली धमकी

 

तक्रारकर्ते काशीकर यांनी त्यांना वारंवार विनंती करूनही ते जुमानत नव्हते. आरोपींनी काशीकर यांना प्लॉटवर आल्यास विनयभंगाची खोटी तक्रार करण्याची धमकी दिली. लॉकडाउननंतर २३ जुलैला सायंकाळी ते पुन्हा प्लॉटवर गेले. घराचे बांधकाम करायचे असल्याने या ठिकाणाहून निघून जाण्याची विनंती केली. त्याचवेळी आरोपी जाधवने त्यांना मारहाण केली तर अन्य आरोपींनी शिवीगाळ केली. सोबतच आमच्याकडे गुंडांची टोळी असल्याचा धाक दाखवीत प्लॉटचा ताबा पाहिजे असल्यास प्रत्येकी १५ लाख रुपये अशी एकूण ६० लाखांची खंडणी मागितली. 

 

कब्जा सोडण्यासाठी ८० लाखांची मागणी

 

प्लॉटवर आल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली आणि धक्के मारून हाकलून दिले. त्यानंतर ४ ऑगस्टला आरोपी ममता शेख व नलिनी बढीये यांनी काशीकर यांना फोन करून शंकरनगर चौकत बोलावून घेतले. प्लॉटवरील कब्जा सोडण्यासाठी ८० लाखांची मागणी केली. याप्रकरणी काशीकर यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for ransom of Rs 80 lakh for acquisition of land