कलावंतांच्या मदतीसाठी गुरूनाथच्या वडिलांनी घेतली महापौरांची भेट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जून 2020

 शहरात मोठ्या संख्येने नाट्यकलावंत राहतात. अनेक कलावंतांच्या रोजीरोटीचे साधनच नाटक असल्याने, त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नाट्यगृहे खुले कधी होतील आणि नाटकांचे खेळ कधी रंगतील असा प्रश्न असताना तुर्तास या कलावंतांना व रंगमंच कामगारांना जगविणे हा महत्त्वाचा उद्देश आहे.

नागपूर : शहरात मोठ्या संख्येने नाट्यकलावंत राहतात. अनेक कलावंतांच्या रोजीरोटीचे साधनच नाटक असल्याने, त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नाट्यगृहे खुले कधी होतील आणि नाटकांचे खेळ कधी रंगतील असा प्रश्न असताना तुर्तास या कलावंतांना व रंगमंच कामगारांना जगविणे हा महत्त्वाचा उद्देश आहे. त्याच हेतूतून स्थापन झालेल्या "मनाकसं'ने शुक्रवारी महापौर संदीप जोशी यांची भेट घेतली. वास्तविकता जाणून घेतल्यानंतर खासदार सांस्कृतिक महोत्सव निधीतून कलावंतांना मदत देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे याप्रसंगी जोशी म्हणाले. 

विशेष म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको या सुप्रसिद्ध मालिकेतील गुरूनाथच्या वडिलांनी अर्थात ज्येष्ठ अभिनेते देवेंद्र दोडके देखील या संघटनेचे प्रतिनिधीत्व करतात. शुक्रवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत देवेंद्र दोडके हे देखील महापौर संदीप जोशींच्या भेटीला गेले होते. विनोदी अभिनेते राजेश चिटणीस देखील याप्रसंगी होते. कोरोना संकटाचा फटका नाट्यक्षेत्राला बसला आहे. या क्षेत्रातील मरगळ आता दूर होणे गरजेचे आहे. अनेकांचे नाट्यप्रयोग रद्द झाले असून, सुमारे सर्वच मंडळांच्या तालिमही बंद आहेत. अशात रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित झालेल्या रंगकर्मींना महापौर संदीप जोशी यांनी मदत जाहीर करण्याचे आश्वासन दिले आहे. महापालिकेतर्फे नाट्यकलावंतांसाठी विशेष मदत करण्यात येईल असे जोशी मराठी नाट्य कलावंत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना म्हणाले. 

वाचा : आयुक्त तुकाराम मुंढेंविरुद्ध मनपा पदाधिकारी, सदस्य असा सामना रंगणार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे हा प्रस्ताव ठेऊन, लवकरच मदत जाहीर केली जाईल असा खंबीर विश्वास त्यांनी यावेळी दिला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र शिंदे, नरेश गडेकर, संजय भाकरे, विनोद काळे याप्रसंगी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Dodke meet NMC Mayor For theater artist