esakal | `दीक्षा`तून घरोघरी पोहोचतो बाबासाहेबांचा विचार; ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत यांचे उद्गार; `दीक्षा` विशेषांकाचे थाटात प्रकाशन 
sakal

बोलून बातमी शोधा

Diksha edition of Sakal is published today presence of Nitin raut

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जो समतेचा विचार या दीक्षाभूमीवर दिला तो सामान्यातील सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम सकाळ माध्यम समहुाच्या माध्यमातून होत आहे, असे गौरवोद्गार राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी काढले. 

`दीक्षा`तून घरोघरी पोहोचतो बाबासाहेबांचा विचार; ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत यांचे उद्गार; `दीक्षा` विशेषांकाचे थाटात प्रकाशन 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः  परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरात लाखो लोंकासह दीक्षा घेत सामाजिक क्रांतीचा एक नवा इतिहास घडविला. जो शोषित, पीडित समाज अंधकारात जीवन जगत होता, त्या असंख्य समाजसमुहांना उजेडात आणण्याचे महान कार्य या धम्मदीक्षा सोहळ्यामुळे झाले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जो समतेचा विचार या दीक्षाभूमीवर दिला तो सामान्यातील सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम सकाळ माध्यम समहुाच्या माध्यमातून होत आहे, असे गौरवोद्गार राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी काढले. 

धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त सकाळ माध्यम समुहाच्या वतीने काढण्यात आलेल्या `दीक्षा` विशेषांकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, सकाळचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे, मुख्य जाहिरात व्यवस्थापक सुधीर तापस यावेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीक्षा अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

डाॅ. नितीन राऊत यांनी दीक्षा विशेषांकाबाबत आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, सकाळ माध्यम समुहाने मागील पंधरा वर्षांपूर्वी `दीक्षा` विशेषांकाची सुरुवात केली. प्रथम अंक प्रकाशित करताना माझ्याशी संपर्क करण्यात आला होता. त्यावेळी मी या विशेषांकाची सुरुवात केलीच पाहिजे, असा आग्रह केला होता आणि त्यासाठी शुभेच्छाही दिल्या होत्या. बघता बघता १६ वा विशेषांक प्रकाशित होत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार सतत लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी सकाळच्या `दीक्षा` विशेषांकाचे फार मोठे योगदान आहे. कोविड काळात दीक्षाभूमी येथे अंक जाणार नाही. परंतु ऑनलाइनच्या माध्यमातून जगभरात अंक पोहोचविण्याचे कामही सकाळच्या वतीने होईल, असा विश्वास वाटतो, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.   

संदीप भारंबे यांनी प्रास्ताविकातून `दीक्षा` विशेषांकाबाबत भूमिका मांडली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आकाशाएवढा आहे. तो एका विशेषांकात सामावण्यासारखा नक्कीच नाही. बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांच्या विविध पैलूंना स्पर्श करण्याचे काम आम्ही गेल्या १६ वर्षांपासून करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धम्मचक्रप्रवर्तनदिनाच्या निमित्ताने `दीक्षा` विशेषांक प्रकाशित करणारे सकाळ हे एकमेव माध्यम समुह आहे, असेही ते म्हणाले. 

प्रारंभी तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यात आले. धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या मान्यवरांनी शुभेच्छाही दिल्या. प्रास्ताविक शहर संपादक प्रमोद काळबांडे यांनी केले. आभार सुधीर तापस यांनी मानले. सोहळ्याला  मुख्य बातमीदार राजेश चरपे, जाहिरात प्रतिनिधी अमोल कोड्डे आणि मिलिंद लोहे उपस्थित होते.      

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे दीक्षा घेतली आणि समतेच्या नव्या युगाला येथूनच सुरूवात झाली. त्यामुळेअनिष्ठ रुढीला सुरुंग लावण्याचे कामही याच नगरीतून सुरू झाले. त्यानिमित्ताने डाॅ. बाबासाहेब यांचा समतेचा विचार `दीक्षा` विशेषांकातून प्रकाशित करण्याचे सकाळ माध्यम समुहाचे काम खरोखरच कौतुकास्पद आहे.
-रवींद्र ठाकरे,
 जिल्हाधिकारी, नागपूर

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवन जगण्यासाठी समतेचा संदेश दिला. समाजाला ताठ मानेने जगण्याचा हक्क बहाल केला. त्या थोर महामानवाला वंदन करण्यासाठी सकाळ माध्यम समुहाने `दीक्षा` विशेषांक प्रकाशित करण्याचा वसा घेतला आहे. तो यापुढेही असाच सुरू राहावा, या माझ्या शुभेच्छा. 
 -रश्मी बर्वे, 
अध्यक्ष, जिल्हा परिषद, नागपूर 

संपादन - अथर्व महांकाळ