Video : बोअरवेलमध्ये झिरपते गडरचे पाणी, नागपुरातील या भागातील नागरिक त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जून 2020

परिसरात जागोजागी रोड व नाल्याही खोदून ठेवण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी पाइप अर्धवट जोडलेल्या स्थितीत आहेत. रोड उंच झाल्याने पाणी थेट घरांमध्ये शिरते. पाऊस वाढल्यानंतर समस्या आणखी गंभीर होऊ शकते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

नागपूर : पावसाच्या पाण्यामुळे गडरलाइन चोक होऊन अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने गोधनी परिसरातील डॉ. कुन्नावार ले-आउटचे नागरिक सध्या हैराण आहेत. दुर्गंधीयुक्‍त पाण्यामुळे त्यांचे जगणे कठीण झाले आहे. जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. 

अशोक अग्रवाल, शैलेंद्र झंझाळ, चेतन पेटकरसह अनेक परिवार गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. कुन्नावार ले-आउटमध्ये वास्तव्यास आहेत. या ले-आउटमध्ये नुकतीच गडरलाइन टाकण्यात आली. रोडचेही काम करण्यात आले. मात्र, पावसाच्या पाण्यामुळे गडरलाइन जागोजागी चोक झाल्याने व पाण्याचा निचरा होत नसल्याने त्यांच्या घराभोवतालच्या खाली प्लॉटमध्ये तलाव साचले आहे.

अधिक माहितीसाठी - दुर्दैवी ! खेळण्या-बागडण्याच्या वयात केतेश्‍वरीचे जाणे मनाला हूरहूर लावणारे...

येथील दुर्गंधीयुक्‍त पाणी वॉल कंपाउंडमधून अंगणात शिरल्याने घरात राहणे अवघड झाले आहे. शिवाय गडरचे पाणी बोअरवेलमध्ये झिरपत असल्यामुळे पाण्यालाही दुर्गंधी सुटली आहे. या पाण्यात साप, विंचू, डुक्‍कर व मोकाट श्‍वानांचा दिवसभर हैदोस असतो. शिवाय डासांचाही सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे येथील प्रदूषित वातावरण एकप्रकारे बिमारीला आमंत्रण देणारे आहे. 

या परिसरात जागोजागी रोड व नाल्याही खोदून ठेवण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी पाइप अर्धवट जोडलेल्या स्थितीत आहेत. रोड उंच झाल्याने पाणी थेट घरांमध्ये शिरते. पाऊस वाढल्यानंतर समस्या आणखी गंभीर होऊ शकते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. 

निधी नाही तरीही उपाययोजना करू

घाण पाणी घरात व विहिरीत शिरत असल्याने नागरिक चांगलेच वैतागले आहेत. त्यांना नानाविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी आपल्या अडचणी गोधनीचे सरपंच दीपक राऊत यांच्या कानावर घातल्या. त्यांनी सध्या ग्रामपंचायतकडे निधी नसल्याचे कारण सांगितले. मात्र, लवकरच यावर उपाययोजना करण्याचेही त्यांनी आश्‍वासन दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dirty water comes to the houses of the citizens In the Godhani area of Nagpur